मुंबईlist of BJP star campaigners :भाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरदार तयारी केली आहे. भाजपानं मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील भाजपाच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्याकडं प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रत्येक राज्यात 40 स्टार प्रचारक :अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं चार राज्यांच्या स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आहे. मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजपानं 40-40 दिग्गज नेत्यांची नावं स्टार प्रचारक म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र राज्यातील यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, यांच्यासह अशोक चव्हाण यांचाही समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील स्टार प्रचारक :भाजपानं महाराष्ट्रासाठी घोषित केलेल्या 40 स्टार प्रचारकांमध्ये केंद्रातील जवळपास सर्वच नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, रामदास आठवले या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या मुख्यमंत्र्यांचासुद्धा महाराष्ट्राच्या यादीमध्ये समावेश आहे.