महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊतांच्या टीकेमुळं शिंदे गटातील नेते प्रसिद्धीच्या झोतात? - Shiv Sena - SHIV SENA

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या टीकेमुळं शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते प्रसिद्धीच्या झोतात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, संजय राऊत यांच्या टीकेमुळं आमच्या नेत्यांना प्रसिद्धी मिळते, असं म्हणणं चुकीचं असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 6:21 PM IST

मुंबई Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठं बंड करत 40 आमदार फोडले. यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालं. मात्र, या फुटीनंतर दोन्ही गटाकडून दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मुख्यतः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर गद्दार असल्याची टीका करत आहेत. राऊतांच्या टीकेनंतर स्वाभाविकपणे शिंदे गटातील प्रवक्त्यांना उत्तर द्यावं लागतं. यामुळं शिंदे गटातील नेते संजय राऊतांच्या निमित्तानं माध्यमांसामोर येताहेत. शिंदे गटातील हे नेते संजय राऊतांमुळं प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कुठले आहेत नेते :शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटानं भाजपासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेना-भाजपा (शिंदे गट) सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिंदे गटाकडून दीपक केसरकर माध्यमांना समोरे आले. मूळ शिवसेनेत दीपक केसरकर फारसे माध्यमांना सामोरे गेल्याचं दिसलं नाही. मात्र, नंतर त्यांनी शिंदे गटाची खंबीरपणे भूमिका मांडली. दुसरीकडं पक्षाचे प्रतोद, आमदार भरत गोगावले मूळ शिवसेनेत असताना माध्यमांना क्वचित सामोरे गेले असतील. मात्र शिंदे गटात पक्षाचे प्रतोद म्हणून त्यांनी माध्यामात नेहमीच भूमिका मांडली. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाठ विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला आक्रमकपणे रोखठोक उत्तर देत आहेत. याव्यतिरिक्त प्रवक्ते किरण पावसकर, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के असे नेतेही मूळ शिवसेनेत फारसे प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. मात्र, नंतर शिंदे गटातील हे सर्वच नेते माध्यमात दिसू लागले. विरोधकांना प्रतिउत्तर देताना शिंदे गटातील या नेत्यांना संजय राऊत यांच्यामुळं प्रसिद्धी मिळतेय का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


राऊतांमुळं प्रसिद्धी मिळते हे चुकीचं :शिवसेनेतील बंडानंतर वारंवार संजय राऊत गद्दार म्हणून आमच्या पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत. वेगवेगळे चुकीचे आरोप करत आहेत. त्याला पक्षातून कोणीतरी उत्तर देणे क्रमप्राप्त आहे. म्हणून आमच्याकडून संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्यात येत आहे. याचा अर्थ असा नाही, की केवळ संजय राऊतांमुळं आमच्या पक्षातील नेते, प्रवक्त्यांना प्रसिद्धी मिळत आहे. यातून आमचे नेते पक्षाची भूमिका, विकासकामं जनतेपर्यंत पोहचवत आहोत. संजय राऊत खोटेनाटे आरोप करताहेत. जर आम्ही शांत बसलो, तर आमच्यावरील आरोप खरे, असं जनतेला वाटेल. म्हणून आम्ही समोर येऊन स्पष्टीकरण देत आहोत. परंतु राऊतांच्यामुळं आम्हाला अस्तित्व प्राप्त झालं, असं म्हणणं अत्यंत चुकीचं असल्याचं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते अरुण सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं आहे.

...म्हणून त्यांना बोलावं लागतंय :ज्यावेळी 90च्या काळात छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा होता. त्यांच्या शब्दाला वजन होतं. त्यावेळी भुजबळ यांनाही अनेक धमक्या आल्या. परंतु माध्यमात आरोप-प्रत्यारोप दिसले नाहीत. तेव्हा माध्यमं एवढी फास्ट नव्हती. मात्र आता माध्यमं फास्ट झाली आहेत. नेत्यांची लाईव्ह पत्रकार परिषद, सभा, कार्यक्रम दाखवले जाताहेत. त्यामुळं एकानं टीका केल्यास दुसरीकडून लगेच टीकेला उत्तर दिलं जातं. आता शिवसेनेत बंड झाल्यानंतर राऊत आरोप करतात त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी संजय शिरसाठ, भरत गोगावले अशा नेत्यांना पुढं येऊन बोलावं लागतंय. परंतु केवळ संजय राऊतांमुळंच शिंदे गटातील नेत्यांना प्रसिद्धी मिळतेय, असं म्हणणं चुकीचं असल्याचं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी; शाळा प्रशासनावर कारवाईचे आदेश, 'या' काँग्रेस नेत्यानं केली होती तक्रार - Lok Sabha Election 2024
  2. अमरावतीसह सोलापुरात राहुल गांधींची तोफ धडाडणार; दोन्ही ठिकाणी तापणार राजकीय वातावरण - Rahul Gandhi Rally
  3. अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu

ABOUT THE AUTHOR

...view details