सातारा Koyana Dam : कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना धरणाचं नवीन तांत्रिक वर्ष सुरु : कोयना धरणाचं १ जून ते ३१ मे हे तांत्रिक वर्ष असतं. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादानुसार १ जून पासून ६७.५ टीएमसी एवढा पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित होतो. उर्वरीत पाणीसाठा हा पुर्वेकडील सिंचन आणि पिण्यासाठी दिला जातो. धरण व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन हे अनेकदा यशस्वी ठरलं आहे. मागील वर्षी देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक होतं. त्या तुलनेत यंदा केवळ अर्धा टीएमसी पाणी कमी आहे.