मुंबई MP Chhatrapati Shahu Maharaj : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं तर महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं. कोल्हापूरची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडं होती. पण त्यांनी ती काँग्रेससाठी सोडली. या ठिकाणी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभूत करत विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष आणि आनंद अजूनही कोल्हापुरात साजरा होत असताना, आज खासदार छत्रपती शाहू महाराजांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री इथं भेट घेतली.
काय आहे भेटीचं कारण : कोल्हापूरची जागा ही शिवसेनेकडे अनेक वर्ष होती. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु, उद्धव ठाकरेंनी या जागेचा त्याग करत ही जागा महाविकास आघाडीसाठी काँग्रेसला दिली आणि आपण काँग्रेसमधून निवडणूक लढवली. मात्र महाविकास आघाडीतून सर्वांनी चांगला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांनीही चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या पाठिंब्यामुळं आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्यामुळं आपण विजयी झालो आहोत. म्हणून आज आपण उद्धव ठाकरेंची भेट घेतली, असं खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून सांगण्यात आलंय.
उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन : खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तसंच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे देखील उपस्थित होते.