मुंबई Khichdi scam case : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सूरज चव्हाणला कथित खिचडी घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयानं कोठडी ठोठावली आहे. या कोठडीत असेपर्यंत आजाराबाबत अधिकृत डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध कोठडीत त्याला देता येईल, असं देखील न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे.
कोरोना काळात खिचडी घोटाळा :मुंबई महापालिकेकडून कोरोना महामारी काळात स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी वाटप करण्यात आलं होतं. ही खिचडी वाटप करताना ठरवल्या पेक्षा कमी वजनाची खिचडी वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात आर्थिक गैरव्यवहार केला गेला, असा आरोप ईडीकडून आरोपी सूरज चव्हाणवर ठेवला गेला आहे. 17 जानेवारी 2024 रोजी सूरज चव्हाणला ईडीकडून अटक केली होती. त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं असता, न्यायालयानं 25 जानेवारी 2024 पर्यँत पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर त्याला 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
आजारांवर उपचार करण्याची परवानगी :आरोपी सूरज चव्हाण याच्या वकिलांनी न्यायालयासमोर न्यायालयीन कोठडी संदर्भात बाजू मांडली. सूरज चव्हाणला आजार आहेत. त्या आजारांवर औषध उपचार करण्याची देखील परवानगी न्यायालयानं द्यावी, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी आरोपीला तुरुंगात काही त्रास झाला आहे का, याची विचारणा केली. आरोपीकडून कुठलाही त्रास झाला नसल्याची स्पष्टता दिली गेली. न्यायालयानं आरोपीच्या वकिलांची विनंती मान्य केली. न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी अधिकृतपणे वैद्यकीय अधिकारी यांनी लिहून दिलेली सर्व औषधं तुरुंगात आरोपीला दिली जावी, असे देखील निर्णयात नमूद केलं.
आरोप रद्द करण्याची मागणी :मुंबई उच्च न्यायालयात देखील दिलासा मिळण्यासाठी सूरज चव्हाण यांनी खटला दाखल केला आहे. आरोपी सूरज चव्हाणवरील आरोप रद्द करावे, तसेच बेकायदेशीर अटक केली गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. ईडीनं आरोपीला आरोपातून मुक्त करावं, अशी मागणी त्यात केली आहे. त्या खटल्याची सुनावणी 29 जानेवारी 2024 रोजी उच्च न्यायालयात होणार आहे, अशी माहिती आरोपी सूरज चव्हाणचे वकील दिलीप साठले यांनी दिली.
हेही वाचा :
- ईडीच्या फेऱ्यात मविआ नेते; रोहित पवार यांच्यानंतर संदीप राऊतांना समन्स तर किशोरी पेडणेकरांची आज होणार चौकशी
- खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या सूरज चव्हाण यांना २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी
- आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक