छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक अर्जात पहिली पत्नी आणि त्यांची मालमत्ता नमूद न केल्यानं परळी दिवाणी न्यायालयानं नोटीस बजावली आहे. "करुणा मुंडे यांनी याबाबत ऑनलाईन पद्धतीनं याचिका दाखल केली होती, त्यावर नोटीस बजावण्यात आली असून २४ फेब्रुवारी रोजी परळी दिवाणी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा देखील होऊ शकते." अशी माहिती याचिकाकर्ते वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांनी दिली नाही माहिती : निवडणूक अर्ज दाखल करत असताना कौटुंबिक तसंच मालमत्तेबाबत माहिती देणं बंधनकारक असतं. राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अर्जामध्ये पहिली पत्नी करुणा मुंडे यांची माहिती दिली नाही. इतकंच नाही तर, राज्यात त्यांच्या नावानं असलेल्या मालमत्तेबाबत माहिती दिली नाही. या शपथ पत्रात पहिली पत्नी करुणा मुंडे यांच्यापासून झालेल्या मुलांचा तर, दुसऱ्या पत्नीचा आणि मुलांचा उल्लेख केला आहे. या विरोधात करुणा मुंडे यांनी परळी दिवाणी न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या निवडीबाबत आक्षेप नोंदवत याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली आहे.