मुंबई : भारतीय नौदलाकडून देशाच्या तटीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा सराव ‘सी व्हिजिल-24 चे आयोजन करण्यात आले आहे.20 आणि 21 नोव्हेंबर या दोन दिवसात होणाऱ्या या सरावात 6 मंत्रालये आणि 22 विविध संस्था सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय नौदल विभागानं दिली. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी हा सराव एक निर्णायक पाऊल ठरणार असल्याचं नौदल विभागानं म्हटलंय.
सर्वात मोठी सागरी सुरक्षा : "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाकडून भारताची तटीय सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशानं अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामधूनच 2018 रोजी 'सी व्हिजिल’ कवायतीची संकल्पना समोर आली. 'सी व्हिजिल-24' ही भारताच्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठीची सर्वात मोठी सागरी सुरक्षा कवायतींपैकी एक आहे. सदर कवायत दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. या सरावातून 11 हजार 98 किलोमीटरची किनारपट्टी आणि 2.4 मिलियन चौरस किलोमीटर आर्थिक क्षेत्राला समावेश करून सदर सराव संपूर्ण तटीय सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देईल," अशी माहिती पश्चिम नौदल कमांडचे वरिष्ठ अधिकारी कमोडोर एम. महेश यांनी दिली.
देशव्यापी तटीय संरक्षण सराव : नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, "या सरावात देशाच्या सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला जातो. यावर्षी देखील 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 रोजी देशव्यापी तटीय संरक्षण सराव ‘सी व्हिजिल-24’ चे चौथी आवृत्ती आयोजित करण्यात आली. 'सी व्हिजिल-2024’ सराव दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात, विविध सुरक्षा संस्थांच्या स्वतंत्र टीम्स तटीय सुविधांना भेट देतील आणि सुरक्षा व्यवस्थेचे आणि पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करतील. हे एका आठवड्यात पूर्ण करण्यात येईल. दुसरा टप्पा ‘टॅक्टिकल फेज’ असेल, ज्यामध्ये सर्व ठिकाणी एकाचवेळी सुरक्षा यंत्रणांची तयारी आणि समुद्रातून होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी त्यांचे समन्वयित प्रतिसाद तपासले जातील."
36 तासांच्या सरावामध्ये काटेकोर चाचणी : "पश्चिम नौदल कमांड क्षेत्रात 2, 700 किलोमीटरची किनारपट्टी आणि 9,000 चौरस किलोमीटरचा अपतटीय तेल क्षेत्र या सर्वांची 36 तासांच्या सरावामध्ये काटेकोर चाचणी घेण्यात येईल. सी व्हिजिल सरावात भारतीय तटरक्षक दल, राज्य सागरी पोलीस, सीमा शुल्क, सीआयएसएफ, मत्स्य विभाग, महासंचालक नौकानयन, बंदर प्राधिकरण, तेल हँडलिंग एजन्सीज, महासंचालक लाइट हाऊस आणि लाइट शिप्स आणि बीएसएफ यांचा सहभाग असणार आहे," अशी माहिती नौदलानं दिली.