चंद्रपूर - वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीतील (bahelia poacher gang) अजित राजगोंड याला चंद्रपूरातील जंगलातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात झालेल्या अनेक वाघांच्या त्यानं शिकारी केल्याचा संशय आहे. अशातच वाघांसाठी नंदनवन ठरलेल्या चंद्रपूरातून त्याला अटक करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने याची पुष्टी केली असून या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पासह परिसरात 100 हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. अशातच वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेला आरोपी अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यात (Ajit Rajgond arrested in Chandrapur) पकडण्यात आलं. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेला आरोपी अजित राजगोंड हा चंद्रपूरात सापडल्यानं वनविभागाला सखोल तपास करावा लागणार आहे.
बहेलिया टोळी शिकारीसाठी कुख्यात- मध्यप्रदेश येथील बहेलिया टोळी ही वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात आहे. वाघांची शिताफीनं शिकार करण्यात ही टोळी तरबेज आहे. या टोळीनं देशभरातील अनेक वाघांची शिकार केली आहे. एवढंच नव्हे तर या टोळीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचंही समोर आलं. 20 वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात बहेलिया टोळीचा वावर होता. त्यानंतर त्यांचं अस्तित्व फारसं दिसून आलं नाही. असे असले तरी तरीही चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वाघांची शिकार झाल्याचं समोर आलं होतं.
यापूर्वी 2021 मध्ये सापडले होते तस्कर- 2021 मध्ये वाघांच्या अवयवाची तस्करी करताना नागपूर येथील बुट्टीबोरी वनविभागानं काही आरोपींना अटक केली होती. या तपासात जिल्ह्यात पोंभुरणा, सिंदेवाही या परिसरात वाघांची शिकार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. डिसेंबर महिन्यात दोन आरोपींना लोहारा येथून अटक करण्यात आली होती. मात्र, यासाठी एक मोठी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं नव्हतं.
तस्कराला वन कोठडी- 25 जानेवारीला राजुरा तालुक्यातील चुनाळाच्या जंगल परिसरात कुख्यात तस्कर अजित दिसून आला. त्याची विचारपूस केल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे वनविभागाला या कुख्यात आरोपीविषयी माहिती नव्हती. चौकशी दरम्यान त्याची ओळख समजल्यानंतर वनविभागाला धक्का बसला. त्याला 26 जानेवारीला वन कोठडी सुनावण्यात आली. त्याची वनविभागाकडून चौकशी सुरू आहे.
इतर राज्यातील वनविभागाला दिली माहिती- अजित हा सप्टेंबर महिन्यातच वाघाच्या शिकार प्रकरणी जामीनावर सुटून आल्याची माहिती आहे. चंद्रपूरसारख्या वाघांसाठी नंदनवन ठरलेल्या जंगलात अजितनं वाघांची शिकार केल्याची शक्यता आहे. याबाबत सहायक वनसंरक्षक जोग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं. अद्याप त्यानं चंद्रपूर जिल्ह्यात शिकार केल्याचं समोर आलेले नाही. त्याला अजित राजगोंड याला पकडल्याची माहिती इतर राज्यातील वनविभागालादेखील देण्यात आल्याची माहिती वनसंरक्षक जोग यांनी दिली.
हेही वाचा-