मुंबई : बॉलिवूड स्टार बॉबी देओलला बॉलिवूडमध्ये 'लॉर्ड' बॉबी म्हणूनही ओळखले जाते. आज 27 जानेवारी रोजी बॉबी देओल 56 वर्षांचा झाला आहे. या विशेष प्रसंगी त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, बॉबीचा मोठा भाऊ आणि बॉलिवूड स्टार सनी देओलनं देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक प्रेमळ फोटोही शेअर केला. 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या बॉबीनं त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यानंतर एक असाही काळ आला, जेव्हा बॉबीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप ठरत होते.
धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका बॉबीनं साकारली : 1977 मध्ये 'धरम वीर' या चित्रपटात बॉबीनं त्याचे वडील धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर या भूमिकेसाठी त्यानं निर्मात्यांकडून पैसे मागितले होते. यानंतर धर्मेंद्रनं बॉबीला समजून घरी पाठवले होते. दरम्यान 1995मध्ये, बॉबीनं 'बरसात' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर 'गुप्त', 'प्यार हो गया' आणि 'चोर मचाये शोर' यासारखे चित्रपट फारसे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. तसेच बॉबीचा अभिनेता म्हणून दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट 'सोल्जर' होता, ज्यानं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख, सलमान आणि आमिर खानच्या चित्रपटांना जोरदार टक्कर दिली होती.
बॉक्स ऑफिसवर तिन्ही खानना स्पर्धा दिली : 1998 मध्ये 'सोल्जर'नं सलमान खानच्या 'प्यार किया तो डरना क्या', आमिर खानच्या 'गुलाम' आणि अजय देवगणच्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली होती. 1998 मध्ये, बॉबीचा 'सोल्जर' हा शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है'नंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला होता. दरम्यान बॉबी देओलनं त्याच्या 3 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'बरसात', 'सोल्जर', 'हमराज' आणि 'अजनबी' हे चित्रपट आहेत. बॉबीचे बॉक्सवर अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत.
फ्लॉप चित्रपट : सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर बॉबी देओल चित्रपटसृष्टीतून गायब झाला होता. एका रिपोर्टनुसार बॉबीनं एका नाईटक्लबमध्ये डीजे म्हणूनही काम केलं आहे. बॉबीला तीन वर्षे बॉलिवूडमध्ये काम मिळाले नाही. तो नैराश्यात गेला आणि ड्रग्जच्या व्यसनाचा बळी पडला. यानंतर त्याची मुले आणि पत्नी देखील बॉबी बद्दल चिंतेत होते. बॉबीनं बेरोजगारीच्या काळात सेलिब्रिटी क्रिकेट लीग देखील खेळली, जिथे त्याचे नशीब चमकले. यानंतर त्यानं 'आश्रम' या वेब सीरीजमधून चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. दरम्यान एका संवादादरम्यान बॉबीनं सांगितलं होतं की, "सलमान खानचीही त्याच्या करिअरला पुढे नेण्यात मोठी भूमिका आहे."
'अॅनिमल' चित्रपटामुळे चमकले नशीब : दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी 'अॅनिमल' चित्रपटात बॉबीला खलनायकाची भूमिका ऑफर केली होती. या चित्रपटामध्ये बॉबी फक्त काही मिनिटांसाठी दिसला आहे. त्यानं 'अॅनिमल'साठी 4 ते 5 कोटी फी घेतली होती. या चित्रपटामुळे बॉबीचे नशीब चमकले. 'अॅनिमल' चित्रपटामधील बॉबीची भूमिका अनेकांना आवडली होती. या चित्रपटानंतर बॉबी हा 'कांगुवा' आणि 'डाकू महाराज' दोन साऊथ चित्रपटात दिसला होता. आता त्याच्याकडे पवन कल्याण स्टारर 'हरी हरा वीरा मल्लू','हाऊसफुल 5', 'अल्फा' आणि थलापती विजयचा 'जन नायगन' हा शेवटचा चित्रपट आहे.
हेही वाचा :