नागपूर Inaugurates Oxygen Bird Park :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'ऑक्सिजन बर्ड पार्क'चं आज लोकार्पण झालं. नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लीफ येथं हे ऑक्सिजन पार्क साकारण्यात आलंय. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर 'ऑक्सिजन बर्ड पार्क' साकारण्यात आलाय. 14 कोटी 32 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प सुमारे 20 एकर क्षेत्रात साकारण्यात आलाय. या क्षेत्रात केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट फळझाडांची लागवड करण्यात आली.
असा आहे बर्ड पार्क : जामठा क्लोव्हर लीफ येथं नागपूर-हैदराबाद (NH-44) विभागावर 20 एकर जागेवर 'ऑक्सिजन बर्ड पार्क' विकसित साकारण्यात आलंय. या पार्कचं महत्त्व केवळ ऑक्सिजनचे स्त्रोत म्हणून नाही तर विविध प्रजातींच्या पक्ष्यांसाठी निवारा म्हणूनही आहे. ऑक्सिजन पार्क 8,104 प्रकारच्या वनस्पतींसह 11 हेक्टर क्षेत्रात विकसित करण्यात आलाय. या प्रकल्पात नैसर्गिक तलावांचाही समावेश करण्यात आलाय. या पार्कमध्ये फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर्स, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेष क्रीडा क्षेत्रांसह विविध सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक वास्तुशिल्प रचना आहे. विशेष म्हणजे हे पार्क विविध प्रकारची फळं देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडं फक्त पक्ष्यांसाठी या उद्यानात लावण्यात आली आहेत.
"पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. ध्वनी, हवा, जलप्रदूषणाचा सामना आपण सर्वजण करत आहोत. प्रदूषणामुळं आयुष्यमान कमी होत आहे. त्यामुळं प्रत्येकामध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली पाहिजे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ऑक्सीजन बर्ड पार्क’ हे उत्तम माध्यम ठरणार आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य होणार," असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.