ठाणेIMPLEMENTATION OF CAA ACT:मोदी सरकारनं 2021 साली सीएए कायद्याला मंजूर दिली होती. त्यानंतर या कायद्याची अंमलबजाणी सुरू झालीय. या कायद्यात, भारतालगतच्या देशांमध्ये राहणाऱ्या पीडित हिंदूंसह शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे हा कायदा मंजूर होण्यापूर्वीच देशभरातून विरोध झाला होता. मात्र, मोदी सरकारनं या कायद्याला मंजुरी दिल्यानं CAA कायदा प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लागू झालाय. त्यामुळं पाकिस्तानातून आलेल्या 58 पीडित सिंधी बांधवांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
अजिज शेख यांच्यासह नागरिकांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) 58 जणांना नागरिकत्व बहाल : आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, अखंड भारताच्या फाळणीनंतरही पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंवर विविध प्रकारे अत्याचार होत आहेत. हा त्रास असह्य झाल्यानं गेल्या पंधरा वर्षात भारतात आलेल्या 58 सिंधी नागरिकांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यान्वये भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलय. उल्हासनगर शहरातील सिंधी भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 58 सिंधी बांधवानी आता आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केलीय. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
नागरिकांनी मांडल्या अत्याचाराच्या व्यथा :या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम, उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानानं विभाजन विभाषिका स्मृती दिवसाचं औचित्य साधून सिंधी भवनात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान देशाचं नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांनी पाकिस्तानात असताना त्यांच्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. पाकिस्तानमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचा व्यवसाय, धर्म सुरक्षित ठेवणं त्यांना कठीण होतं. आता हिंदू म्हणून त्यांना भारतात सुरक्षित वाटतंय, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
हिंदूंनी महत्त्वाकांक्षी राहावं :या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदानंद सप्रे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी अखंड भारत ह्या संकल्पनेवर प्रकाश टाकत त्यांचं मत देखील मांडलं. इस्रायल देशाचं उदाहरण देताना ते म्हणाले, "हिंदूंनी महत्त्वाकांक्षी राहावं. पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त सिंध प्रांतात हिंदूंची घरं असतील." यावेळी महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी, पालिका आयुक्त अजिज शेख, अतिरीक्त आयुक्त किशोर गवस, लाल पंजाबी, राजेश वधाऱ्या, राजू जग्यासी, विनोद तलरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापिका प्रिया वाच्छानी, सीमा मेघानी यांच्या प्रयत्नातून सिंधी भवनात तळ मजल्यावर प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं.