मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुंबईत मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आपली नाराजी आणि खदखद त्यांच्यासमोर व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. साळवी हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साळवींनी शनिवारी मातोश्री गाठत ठाकरेंसमोर आपली नाराजी व्यक्त केलीय.
उद्धव ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील : यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री तथा दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुंबईतील संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून आपल्या भावना ठाकरेंना सांगितल्याची माहिती राजन साळवी यांनी ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या 2024 मध्ये झालेल्या मतदारसंघातील पराभवाला कारणीभूत असलेल्या घटनांची माहिती ठाकरेंना दिली. त्यांनी ती माहिती ऐकून घेतली. ही माहिती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी आपली अपेक्षा आहे. आपण पराभवानंतर राजापूर, लांजा तालुक्याचा दौरा केला आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांनी या निवडणुकीतील पराभवाबाबत, पराभवाच्या कारणांबाबत आपल्याया माहिती दिली. आपल्यापर्यंत अनेक गोष्टी आल्या होत्या, त्या सर्व बाबी आपण आज ठाकरेंच्या समोर मांडल्या, असे साळवी यांनी स्पष्ट केले.
काही वरिष्ठ आपल्या पराभवाला जबाबदार : पदाधिकारी भाजपात जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा असल्याबद्दल साळवी म्हणाले, त्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली असतील, या सर्व घडामोडींबाबत आपण पक्षाच्या नेतृत्वाला माहिती दिली असल्याचे साळवी म्हणाले. शुक्रवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना साळवी यांनी आपण नाराज असून, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. काही वरिष्ठ आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे साळवी हे पक्ष सोडतील अशा चर्चांना उधाण आलंय. राजापूर मतदारसंघातून राजन साळवी हे शिवसेनेच्या तिकिटावर 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा विजयी झाले होते. 2024 च्या निवडणुकीत ते शिवसेना उबाठातर्फे रिंगणात होते, त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे उभे राहिलेल्या किरण सामंत यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिलाय.
हेही वाचा :