पुणे Pune Crime News : राज्यात मराठी भाषेवरुन आता वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच ठाण्यात मराठी भाषेवरुन झालेल्या वादानंतर आता पुण्यात देखील हिंदी-मराठी वाद पेटला आहे. एका कंपनीच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल असं म्हणणाऱ्या वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलनं चोप दिला आहे.
नेमकं काय घडलं : पुण्यातील वाकडेवाडी इथं मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसे स्टाईलने चोप दिला आहे. एका कंपनीच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं मराठीमध्ये जर बोलले तर कामावरुन काढून टाकेल तसंच हिंदू सणांना सुट्टी न देणे आणि गेल्या 3 महिन्यांपासून मराठी पोरांचा पगार केला नसल्याच्या तक्रारी येथील कामगारांनी मनसेकडे केली असता मनसे स्टाईलने याला उत्तर देण्यात आलं. तसंच येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला हवे अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील संबंधित कंपनीचे ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.
ठाण्यातही घडला असाच प्रकार : गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा वाद हा ठिकठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका अधिकाऱ्यांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुंब्रा इथं मराठी युवकाला माफी मागायला लावली आणि आता पुण्यात चक्क मराठी कामगारांना हिंदी मध्येच बोला अशी सक्ती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मुंब्य्रातील प्रकरण काय : गुरुवारी मुंब्रा परिसरात एका तरुणानं विक्रेत्याला मराठीत फळाची किंमत विचारली. त्यावर फळविक्रेत्यानं मराठी भाषा मला समजत नाही. हिंदीत बोलले पाहिजे, असे म्हटले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर तेथील जमावानं मराठी तरुणाला माफी मागण्यास भाग पाडलं. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरुणाला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्यावर शांतता भंग केल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. सायंकाळी फळ विक्रेत्याला पाठिंबा देणारा जमाव घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला.
हेही वाचा :