सातारा - शासकीय नोकरीच्या अमिषानं ९० लाख रुपये उकळून तरुणांची फसवणूक करणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अखेर खऱ्या पोलिसांनी गजाआड केलं. श्रीकांत विलास पवार (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असं तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे. तो कराड जवळच्या कोयना वसाहतीत वास्तव्यास होता.
तोतया अधिकाऱ्यावर पोलिसांची पाळत -नोकरी लावण्याच्या आमिषानं तोतया आयपीएस अधिकाऱ्यानं तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर आणि कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी आणि पोलीस अंमलदार संदीप कुंभार, अशोक वाडकर, महेश शिंदे यांनी काही दिवसांपासून तोतया अधिकाऱ्यावर पाळत ठेवली होती.
१३ तरुणांकडून उकळले ९० लाख -तोतया अधिकारी पोलिसांना सातत्यानं गुंगारा देत होता. अखेर बुधवारी (२५ डिसेंबर) त्यास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. प्राथमिक चौकशीत त्यानं कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ तरुणांची ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. तोतया अधिकाऱ्यावर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही फसवणुकीच्या तक्रारी नोंद आहेत.
पीएमओ, पोलीस खात्याच्या नावे मेल आयडी -शासकीय विभागात नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचं भासवण्यासाठी तोतया अधिकाऱ्यानं पंतप्रधान कार्यालय, राज्य शासन आणि पोलीस दलाच्या नावे मेल आयडी तयार करून तरुणांना मेल पाठविल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अलिशान कार, लाल दिवा आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. एका तरुणाच्या तक्रारीवरून तोतया अधिकाऱ्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा..
- तोतया आयपीएसकडून व्यावसायिकास कोट्यवधीचा गंडा, नेमकं प्रकरण काय?
- तोतया पोलीस पथकाचा कुरियर व्हॅनवर दरोडा; ५ कोटी ४० लाख लुटले, चौघांना अटक - Robber absconded