मुंबई IMD Issues Red Alert : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. अशातच आता हवामान विभागानं पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या किनारपट्टी भागात आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान झारखंडमधील वातावरणाचा रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
झारखंडच्या वातावरणाचा रायगड, सातारा जिल्ह्याला फटका :मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाची संततधार सुरू राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र, विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मध्यप्रदेश आणि झारखंड इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातील मध्यप्रदेश राज्यात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता बऱ्यापैकी निवळला असून, झारखंड आणि परिसरात सात किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारं वाहण्याची शक्यता आहे. या दोन राज्यातील हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.