महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर सुरेश धसांना देव अन् इतिहास क्षमा करणार नाही, संजय राऊतांची टीका - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

देशमुख कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर त्यांना देव आणि इतिहास क्षमा करणार नाही, अशी टीका शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलीय.

Thackeray group MP Sanjay Raut
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2025, 11:59 AM IST

मुंबई- बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठवणारे भाजपाचे आमदार सुरेश धसांची मुंडे यांच्यासोबत भेट झाल्याचे समोर आलंय. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे, असे मला काही लोकांनी आधीच सांगितले होते. दुर्दैवाने हे सत्यात उतरताना दिसत आहे. विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला, याचे मला दुःख होत आहे. धस यांनी हे कृत्य केले असेल तर आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर त्यांना देव आणि इतिहास क्षमा करणार नाही, विश्वासघातापेक्षा हे पुढचं पाऊल आहे, अशी टीका शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलीय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

धस यांनी खंजीर खुपसला असेल तर...- राऊत : एका नाण्याला दोन बाजू असतात, या ठिकाणी तीन बाजू आहेत. धस यांच्याकडून असे कोणतेही कृत्य होणार नाही, अशी मला अपेक्षा असल्याचंही ते म्हणालेत. सुरेश धस यांच्या माध्यमातून न्याय मिळेल, यासाठी संतोष देशमुखांची लहान मुले न्यायासाठी धस यांच्या मागे धावत होती, त्यामुळे धस यांनी खंजीर खुपसला असेल तर मात्र ते फार चुकीचे ठरेल, असंही संजय राऊत म्हणालेत. भाजपाचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभेला जनता तुमच्यावर थुंकली, त्यामध्ये तुम्ही वाहून गेलात हे विसरू नका, असा टोला त्यांनी रावसाहेब दानवे यांना राऊतांनी लगावलाय.

शाहांनी शिवसेनेचा गट फोडून शिंदेंना चालवायला दिलाय :विधानसभेला तुम्ही पाप करून जिंकून आला आहात हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत म्हणालेत. तुमचा पक्ष मोठा नाही तर छोटा आहे, तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केली, त्यामुळे पक्ष मोठा वाटतोय, भ्रष्टाचाराची सगळी थुंकी तुम्ही चाटताय, ही नवीन परंपरा तुम्ही आणली. ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केले, त्यांनाच तुम्ही पक्षात घेतले, अशी टीका त्यांनी केली. एकनाथ शिंदेंचा कोणताही पक्ष नाही, शिवसेनेतला एक गट फोडून तो गट अमित शाह यांनी शिंदे यांना चालवायला दिलाय. तो त्यांच्या मालकीचा पक्ष आहे. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत, ते मराठी माणसांसंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात, असंही संजय राऊत म्हणालेत.

आम्ही कुंभमेळ्याला जाणार :भास्कर जाधव यांनी माझ्याकडे काम करण्याची क्षमता असतानाही मला पक्षात संधी मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवल्यासंदर्भात संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले, आमदार भास्कर जाधव यांच्याशी आमची काल चर्चा झालीय. आजही पुन्हा भेटणार आहोत त्यावेळी चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कुंभमेळ्याला जाणार आहोत. कुंभमेळ्यामध्ये 2 हजारांपेक्षा जास्त भाविक गायब झाल्याने आम्हाला वाटते त्यांचा मृत्यू झालाय, याबाबत सरकारने उत्तर देण्याची गरज आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न विचारला, तेव्हा माझा माईक बंद केला, त्यामुळे सरकार मृतांचा आकडा लपवत आहे, अशी शंका वाटत असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचाः

"...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला

महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ABOUT THE AUTHOR

...view details