पुणे IAS Pooja Khedkar : ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला. आधीच दोन दिव्यांग प्रमाणपत्र असताना त्यांनी तिसऱ्यांदाही दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं उघड झालं. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात 22 ऑगस्ट 2022 ला त्यांनी अर्ज केला होता. मात्र, रुग्णालय प्रशासनानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, दोन प्रमाणपत्र असताना पूजा खेडकर यांनी तिसऱ्यांदा अर्ज का केला? असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय.
तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी केला अर्ज : पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आणखी खोल वादाच्या भोवऱ्यात खेडकर कुटुंब सापडत आहे. दोन प्रमाणपत्र असताना खेडकर यांनी तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज का केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूजा खेडकर यांची आधीची दोन प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रमाणपत्राची केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीकडूनही चौकशी केली जाणार आहे. परंतु, त्यांनी तिसऱ्या पत्रासाठी देखील अर्ज केलेला होता. खेडकर यांनी नाव बदलून परिक्षा दिल्याचीही माहिती समोर येत आहे. पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचं एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती आहे. तसंच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे यांनी सांगितलं.
दिव्यांग प्रमाणपत्रासह नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा वाद : पूजा खेडकरनं UPSC नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र देखील जोडलं होतं. पण पूजाच्या ओबीसी नॉन क्रीमिलीयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्यांना ओबीसी नॉन क्रीमीलेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता