नवी दिल्ली - शिवसेना (यूबीटी) च्या आठ खासदारांनी शुक्रवारी पक्षाशी ठामपणे एकनिष्ठ असल्याचं प्रतिपादन केलं. खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षत्याग करुन नेते त्यांच्याकडे यत असल्याचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दावा फेटाळून लावला.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दावा केला होता की, अनेक विद्यमान आणि माजी आमदार आणि शिवसेनेचे (यूबीटी) सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्यासाठी तयार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे (यूबीटी) लोकसभेत नऊ आणि राज्यसभेत दोन सदस्य आहेत.
शुक्रवारी (आज), शिवसेनेचे (यूबीटी) लोकसभा सदस्य - अरविंद सावंत, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं प्रतिपादन करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
सावंत यांनी असा दावा केला की, शिवसेना (यूबीटी) च्या कोणत्याही खासदारांना कोणताही फोन आला नाही आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पक्षत्याग झाल्याच्या "अफवा पसरवण्याच्या" प्रयत्नांचा त्यांनी निषेध केला.
सावंत पुढे म्हणाले की, शिवसेना (यूबीटी) चे खासदार कठीण काळात पक्षासोबत होते आणि पुढेही राहतील. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सत्तेत आल्यापासून दोन्ही संघटनांमध्ये वाद सुरू आहेत. ज्यामुळे विरोधी महाविकास आघाडीला २८८ सदस्यांच्या विधानसभेत फक्त ४६ जागा मिळाल्या आहेत.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत ५७ जागा जिंकल्या आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर वर्चस्व मिळवले.