नागपूर : नागपूर शहरात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव (Bird Flu Outbreak in Nagpur) झाला असून या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाल्याचं बघायला मिळतंय. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार पशूसंवर्धन विभाग आणि मनपाच्या आरोग्य विभागानं बुधवार (5 फेब्रुवारी) सायंकाळपासून बाधित क्षेत्रातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केलीय. यात दोन दिवसात एकूण 3 हजार 54 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
नागपूरच्या ताजबाग येथील एका व्यक्तीकडील 3 कोंबड्या 31 जानेवारी रोजी मृत आढळल्या होत्या. त्यानंतर पशुसंवर्धन विभागानं तपासणी करुन याचे नमुने भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, आनंद नगर, भोपाळ आणि रोग अन्वेषण विभाग, पुणे येथे पाठविले होते. या तपासणीनंतर कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळं झाल्याचं समोर आलं. या अहवालानंतर प्राप्त अधिकारान्वये मोठा ताजबाग नागपूर शहर आणि त्या आसपासच्या एक किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. तसंच बाधित क्षेत्रापासून उर्वरित नऊ किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तसंच या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची तसंच निगडित खाद्य आणि अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलाला आदेश देण्यात आले आहेत.
3054 कोंबड्यांची विल्हेवाट : राज्याच्या पशूसंवर्धन विभाग आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं मोठा ताजबाग भागात कोंबड्यांची मोजणी आणि विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केलीय. पहिल्या दिवशी दोन हजार कोंबड्या नष्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी हजारावर कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आल्या. दोन दिवसात अशा एकूण 3054 कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आलीय. याशिवाय 180 अंडी आणि 1 हजार किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.
अन्य पक्ष्यांचे नमुनेही गोळा करण्याचं काम सुरू : या भागातील अन्य पक्ष्यांना 'बर्ड फ्लू'चा प्रसार होऊ नये यासाठी दहा किलोमीरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. या भागातील अन्य पक्ष्यांचे नमुनेही गोळा करून त्यांची तपासणी करण्यासाठी पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबला पाठवले जात आहेत. तीन पक्ष्यांव्यतिरिक्त अन्य कुठेही 'बर्ड फ्लू'ची लागण झाल्याचं अद्याप निष्पन्न झालं नसल्याचं सांगितलं जातंय. बाधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण केलं जात असून यात प्रामुख्यानं इन्फ्ल्युएन्झा सदृश्य रुग्णांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. तर "सर्व खासगी रुग्णालय आणि वैद्यकीय व्यवसायिकांनी ‘आयएलआय’ आणि ‘सारी’ रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागाला द्यावी," असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केलंय.
अशी घ्या काळजी : पक्ष्यामधील स्त्रावासोबत संपर्क टाळा, पक्ष्यांना चारा देणारी भांडी रोज निर्जंतूक करा. पक्षी मरण पावला तर उघड्या हातानं स्पर्श टाळा. कच्चे चिकन हाताळताना ग्लोव्ह्जचा वापर करा. 100 डिग्री सेल्सीअस मांसाचाच अन्नात वापर करा. कच्चे चिकन, कच्ची अंडी खाणं टाळा. तसंच आजारी दिसणाऱ्या, आणि सुस्त पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका.
हेही वाचा -