मुंबई - छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा असलेला 'छावा' हा चित्रपट तमाम देशवासीयांचं लक्ष वेधत आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. यासाठी चित्रपटाची टीम देशभर प्रमोशनसाठी फिरत आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विकी कौशल ही भूमिका साकारताना घेतलेल्या मेहनतीबद्दल तर बोलत आहेच, परंतु छत्रपती संभीजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाली याचा सार्थ अभिमानही बोलून दाखवत आहे. अलीकडे त्यानं दिलेल्या मुलाखतीत, ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल दिग्दर्शकाचं आभारही मानलं.
"छत्रपती संभाजी महाराज साकारताना विकीला त्यातलं वेगळंपण काय जाणवलं आणि त्यानं आता काय घेतलंय?", असं विचारलं असता विकी कौशल म्हणाला, "छत्रपती संभाजी महाराजांचा एक ज्वलंत अॅटिट्यूड होता. त्यांनी 127 युद्ध लढली आणि जिंकली किंवा 60 किलोची तलवार हा त्यांचा अॅटीट्यूड नव्हता....तर जेव्हा नऊ वर्षाचे असताना ते आग्र्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर निसटले आणि जेव्हा ते महाराजांपासून वेगळे झाले तेव्हा नऊ वर्षाच्या त्या मुलाचा काय अॅटिट्यूड असेल....त्यानंतर वयाच्या 13 -15 वर्षापर्यंत 13 - 15 भाषा जाणणारा, पुस्तकं लिहिणारा, कविता करणारा, छत्रपती संभाजी महाराज फक्त तलवार, घोडा चालवणारे योद्धा नव्हते तर त्यांचा तो एक अॅटिट्यूड होता."
छत्रपती संभाजी महाराज हे प्रजेची काळजी घेणारे साहसी राजा होते याबद्दल सांगताना विकी पुढं म्हणाला, "प्रजेबद्दल माझी काय जबाबदारी आहे, त्यासाठी जे साहस पाहिजे ते केवळ युद्ध करुन, किंवा युद्ध भूमीवर होणार नाही तर मला प्रत्येक क्षेत्रात हे धाडस दाखवायचं आहे, ही महाराजांची भूमिका होती. वयाच्या 20-22 वर्षात छत्रपती शिवाजी महराजांचा वारसा पुढं चालवला हे त्याचं किती महान काम आहे. आज मी 37 वर्षांचा आहे, मी त्यांच्या कामाच्या कणभरही जगू शकलो किंवा साकारु शकलो, तरी मोठं काम असेल. त्यांचं काम हे काही रचलेलं कथानक नाही, तर ती एक सत्यकथा आहे. त्यांनी जर वाघाचा जबडा फाडलाय तर फाडलाय... याबद्दल विचार जरी केला तर भारी वाटतं, पण लक्ष्मण उत्तेकर सरांनी मला तो क्षण जगण्याची संधी दिली. यामध्ये त्यांच्यातल्या किती तरी गोष्टी आतमध्ये गेलेत... ज्यामध्ये त्यांचं साहसं आहे, त्यांचं व्यक्तीमत्व आहे, ते एक योद्धा होते पण त्याचवेळी ते एक पिताही होते, पतीही होते, मित्रही होते, हे सर्व पैलू आम्ही चित्रपटात घेतले आहेत आणि ते क्षण जगण्याची संधी मिळाली त्यामुळं आता आयुष्यभर त्याबद्दल शिकत राहीन," असं विकी कौशल म्हणाला.