अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी पती-पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - KALYAN GIRL RAPE MURDER CASE
अल्पवयीन मुलीवरील हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार विशाल गवळी, तर त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना कल्याण जिल्हा न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
Published : Dec 26, 2024, 12:58 PM IST
ठाणे :गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. ठाण्यातील कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागातील 12 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर एका नराधमानं स्वतःच्या राहत्या घरात अत्याचार करून तिची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह रिक्षातून घेऊन जात भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील निर्जनस्थळी फेकलाय. या घटनेतील मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून, तर त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण शहरातून अटक करण्यात आलीय. या दोघांना आज कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहणारी 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता घरातून बाहेर पडली होती. कोळसेवाडी भागात राहणाऱ्या विशाल गवळीची या अल्पवयीन मुलीवर नजर पडली. त्यानं तिला फूस लावून स्वत:च्या घरी आणले. तिथे तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून राहत्या घरातच तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आलीय. 35 वर्षीय विशाल गवळीची पत्नी साक्षीने घरात घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांनी केलेल्या चौकशीत कथन केला. आरोपी विशालने सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान मुलीला फूस लावून आपल्या घरी आणले अन् तिच्यावर अत्याचार केलेत. मृत मुलीने आपण केलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला तर आपली नाचक्की होईल. त्यामुळं विशालने तिची घरातच हत्या केलीय. मुलीची हत्या केल्यानंतर विशालने तिचा मृतदेह घरातील एका बॅगेत भरून ठेवलाय.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आखली योजना :विशालची पत्नी साक्षी बँकेत नोकरी करते. ती सोमवारी रात्री घरी आली. विशालने तिला घरात घडलेली घटना सांगितली. विशालने पत्नी साक्षीच्या साहाय्याने त्यातच रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. घरात पडलेले रक्त दोघांनी स्वच्छ केले. विशालने आपला मित्र असलेल्या रिक्षाचालकाला घरी बोलावले. मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवण्यात आली. पत्रीपूल मार्गे विशाल, साक्षी आणि रिक्षा चालक मृतदेह असलेली बॅग घेऊन भिवंडी पडघा दिशेने निघाले. बापगाव भागात अंधार असल्यानं तेथे कोणीही आजूबाजूला नाही. वाहनांची वर्दळ नसल्याचं पाहून विशालने मृतदेह बापगाव कबरस्तान भागातील जंगली झुडुपे असलेल्या भागात फेकला. त्यानंतर आरोपी विशालने आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्याची बाटली खरेदी केली. तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी निघून गेला. पत्नी साक्षीला रिक्षाचालकाने घरी सोडले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जाळ्यात :विशालच्या घराच्या बाहेर रक्ताचे डाग पडले होते. सीसीटीव्ही यंत्रणेने विशालला टिपले होते. विशालचा माग काढताच पोलिसांना त्याचा घराबाहेर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांचा संशय बळावला. या प्रकरणाचा पोलिसांनी नंतर झटपट उलगडा करून विशाल, पत्नी साक्षीला, रिक्षाचालक यांचा सीसीटीव्ही चित्रणाद्वारे माग काढून त्यांना 24 तासांच्या आतच अटक केली. मुलीचा शवविच्छेदन अहवाल आला असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. आरोपीविरोधात पोक्सोच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी दिलीय.
हेही वाचा :