मुंबई Hit and Run Accident : पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण संपूर्ण देशात गाजलं होतं. त्यानंतर कार अपघाताची प्रकरणं कमी होतील, असं वाटत असतानाच आता राज्यात अनेक ठिकाणी हिट अँड रन प्रकारचे अपघात घडत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यात हिट अँड रनचे तीन अपघात समोर आले असून यात चार जणांचा मृत्यू झालाय. राज्याची राजधानी मुंबईसह पुणे आणि छत्रपती संभाजीनगरात या घटना घडल्या आहेत.
मुंबईत महिलेचा मृत्यू : पहिल्या घटनेत मुंबईतील वरळी परिसरात हिट अँड रनची घटना समोर आल्यानं मुंबईचं नव्हे तर राज्य हादरलं. वरळीत BMW गाडीनं एका दाम्पत्याला उडवलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेता राजेश शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. राजेश शहा यांचा मुलगा आरोपी मिहीर शहा फरार असून, ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिदावतला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा राजेंद्रसिंग बिदावत आणि आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांना अटक केली. या प्रकरणामुळं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यापोर झाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात चक्क पोलिसांनांच उडवलं : दुसरी घटना आहे पुण्यातील. शहरातील कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रन अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं. या घटनेत एका अज्ञात वाहनानं दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना शहरातील हॅरिस ब्रीज बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री घडली. यात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी आरोपी वाहनचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे शहरातील कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल अपघातानंतर देशातील हिट अँड रनची देशभरात चर्चा झाली. अशातच पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडल्यानं नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
स्कुटीवर जाणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू : तिसऱ्या घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लेंभेवाडी फाट्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील पती आणि पत्नी जागीच ठार झाले. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला. ही कार छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असताना भरधाव वेगात असल्यानं कार चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर ही कार दूभाजकाला धडकली. त्याचवेळी दुसऱ्या दिशेनं जाणाऱ्या स्कुटीला उडवून त्यावर ती कार नाल्यात पलटी झाली. विशेष म्हणजे या अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची सोशल मीडियावर असलेली रिल्स चर्चेत आली आहे.
हेही वाचा :
- वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, मृत महिलेच्या पतीची मागणी; आरोपीनं मद्यप्राशन केल्याचा संशय - Worli Hit And Run Case