मुंबई Heavy Rain In Mumbai : जोरदार पावसानं मुंबईला चांगलाच दणका दिला आहे. मुंबईत रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. तर जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमान यामुळे मुंबई विमानतळावरील तब्बल 50 विमानं उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जोरदार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे इथल्या शाळांना सुटी देण्यात आली. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं.
मुंबईतून 50 उड्डाणं रद्द :मुंबईला सोमवारी जोरदार पावसानं झोडपलं. त्यामुळे मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल 50 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यापैकी इंडिगो कंपनीला आपली 42 उड्डाणं रद्द करावी लागली. एअर इंडियाची 6 उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी दिली. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) खराब हवामानामुळे सोमवारी पहाटे 2:22 ते पहाटे 3:40 पर्यंत धावपट्टीचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं, असं सूत्रांनी सांगितलं. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMI) प्रशासनानं प्रवाशांच्या मतदीसाठी विमानतळावर कर्मचारी तैनात केले आहेत," असं स्पष्ट केलं.
हैदराबाद, अहमदाबाद आणि इंदूरला वळवली विमानं :मुसळधार पावसाचा मोठा फटका विमानसेवेला बसला. कमी दृष्यमानता असल्यानं 50 उड्डाणं रद्द करण्यात आली. तर काही विमानं इतर विमानतळावर वळवण्यात आली. यात हैदराबाद, अहमदाबाद आणि इंदूरला विमानं वळवण्यात आली. रनवे ऑपरेशन्स पहाटे 2:22 ते पहाटे 3:40 पर्यंत थांबवावं लागलं. त्यामुळे जवळपास 27 उड्डाणं जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. यात अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदूर या शहरांकडं विमानं वळवण्यात आली, अशी माहिती या सूत्रांनी दिली.
मायानगरीत सोमवारी झाला 101.8 मीमी पाऊस :मुंबईत सोमवारी 9 तासात तब्बल 101.8 मीमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तर उपनगरात 14.8 इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात इतर भागातही जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. "कुलाबा हवामान केंद्रात सोमवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 101.8 मिमी पावसाची नोंद झाली," असं भारतीय हवामान विभाग (IMD) मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं. तर सांताक्रूझ हवामान केंद्रात सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत केवळ 14.8 मिमी पावसाची नोंद झाली, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- मुंबई पुन्हा तुंबली; पावसाला तोंड देण्यास बीएमसी आणि रेल्वेची यंत्रणा अपयशी - Mumbai Heavy Rain
- मुंबईच्या मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही बसला फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास - Mumbai Rain
- मुंबई तुंबली पावसात; राजकारणी तुंबले आरोप-प्रत्यारोपात - Mumbai Rain