अमरावती Amravati Ganeshotsav : 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करत आज (7 सप्टेंबर) अंबानगरीत गणरायाचे थाटात आगमन झाले. यंदा पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींना भाविकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. तसंच घरोघरी सकाळपासूनच गणपती प्रतिष्ठापनेची धामधूम पाहायला मिळत आहे.
अंबानगरीत गणरायाचं थाटात आगमन (ETV Bharat Reporter) अमरावतीत दोन ठिकाणी सर्वाधिक गर्दी :गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती भक्तांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं शहरातील सायन्सकोर मैदान आणि नेहरू मैदान या दोन ठिकाणी अधिकृत गणपती विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी गणपती बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांची शुक्रवारपासूनच गर्दी उसळली होती. तसंच आज सकाळपासूनच या दोन्ही मैदानावर ढोल ताशांच्या नादात भाविक आपल्या घरी गणरायाला नेत असल्याचं बघायला मिळालं. शहरातील फ्रेझरपूरा परिसरात असणाऱ्या मूर्तिकारांच्या वसाहत परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी लागणाऱ्या भव्य मूर्ती नेण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर अशा मोठ्या वाहनांची रीघ लागली. यासह राजापेठ परिसरातील कुंभारवाडा परिसरातून देखील मोठ्या संख्येनं गणरायाच्या भव्य मूर्ती नेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली.
मातीच्या गणपतीला पसंती : प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीला भाविकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली. नेहरू मैदान या ठिकाणी वन्यजीव आणि पर्यावरण संस्थेनं लावलेल्या पर्यावरणपूरक मातीच्या गणपती स्टॉलवरून गणरायाच्या सुमारे दोन हजारांवर मूर्ती आज सकाळी 11 वाजेपर्यंत भाविकांनी आपल्या घरी नेल्या. आपल्या घरी पर्यावरणपूरक मातीच्याच गणपतीची स्थापना करा, असे फलक शहराच्या विविध भागात गत आठ दिवसांपासून झळकले आहेत. गतकाही वर्षापासून अमरावतीकर मोठ्या प्रमाणात मातीच्याच मूर्तींना प्रतिसाद देत आहेत.
मातीच्या मूर्ती सोबत कुंडी मोफत :मातीची मूर्ती घेण्यासाठी भाविकांना प्रोत्साहित करण्याच्या निमित्तानं मूर्तिकार निलेश कंचनपुरे यांनी गणपतीच्या मूर्तीसोबत एक कुंडी आणि त्यात लावण्यासाठी एक रोपटे भाविकांना मोफत दिलेत. गणपती बाप्पाचे विसर्जन या कुंडीतच करावं आणि त्यामध्ये वृक्ष लावून गणरायाच्या नावानं ते वृक्ष जोपासावं हा त्यामागचा उद्देश निलेश कंचनपूरे यांचा आहे. तर "मी गत काही वर्षांपासून निलेश कंचनपुरे यांच्याकडून गणपती बाप्पांची मूर्ती घेतो आणि सोबतच कुंडी आणि एक रोपटे देखील आम्हाला मिळतं", असं बाल सिने कलावंत श्रीनिवास पोकळे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला. प्रत्येकानं आपल्या घरात मातीनं तयार केलेल्या गणपतीची मूर्ती स्थापन करावी,असं आवाहन देखील श्रीनिवास पोकळे यानं केलंय.
जिल्ह्यात 1309 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : अमरावती जिल्ह्यात यावर्षी एकूण 1309 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होत आहे. यापैकी अमरावती शहरात 497 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. विघ्नहर्ताचं आगमन थाटात व्हावं यासाठी अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय.