महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लालबागचा राजा' परतीच्या प्रवासाला ; बाप्पाचं खोल समुद्रात विसर्जन, साश्रू नयनांनी भाविकांनी दिला निरोप - Lalbaugcha Raja Visarjan 2024 - LALBAUGCHA RAJA VISARJAN 2024

Lalbaugcha Raja Visarjan 2024 : भाविकांचा लाडका 'लालबागचा राजा' गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देत 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष केला.

Lalbaugcha Raja Visarjan 2024
लालबागचा राजा (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 10:55 AM IST

Updated : Sep 18, 2024, 12:06 PM IST

मुंबई Lalbaugcha Raja Visarjan 2024 :भाविकांचा आवडता 'लालबागचा राजा' गणपती बाप्पा मंगळवारी परतीच्या प्रवासाला निघाला. अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आज सकाळी साश्रू नयनांनी निरोप दिला. लाडका बाप्पा असलेला लालबागचा राजा आज सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचला. तब्बल 23 तासानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत 'लालबागचा राजा'चं खोल समुद्रात विसर्जन करण्यात आलं. त्यामुळे हा निरोपाचा क्षण पचवणं भाविकांसाठी मोठं जड जात आहे. गिरगाव चौपाटीवर भाविक गहिवरले.

लालबागचा राजा (Reporter)

तब्बल 23 तास चालली लालबागचा राजा बाप्पाची मिरवणूक :लालबाग मार्केटमधून राजाची निघालेली विसर्जन मिरवणूक मार्केटच्या सिग्नल वरून यू टर्न घेत भारत माता दिशेनं पोचली. त्यानंतर भारत माता सिग्नल इथून यूटर्न घेऊन पुन्हा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक श्रॉफ बिल्डिंगच्या पुष्पवृष्टीकडं मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पोहोचली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बकरी अड्डा सिग्नलला राजाची थाटात मिरवणूक पोहोचली. त्यानंतर पुढं नागपाडा, दोन टाकी, कुंभारवाडा आणि गिरगाव परिसरातून गिरगाव चौपाटीवर आज सकाळी नऊ साडेनऊ वाजताच्या सुमारास दाखल झाली.

लालबागचा राजा (ETV Bharat)

लालबागचा राजानं घेतला भाविकांचा निरोप : गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा आल्यानंतर बाप्पाची आरती करून लालबागच्या राजानं आपल्या अंगावर परिधान केलेले दाग दागिने मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उतरवण्यात आले. त्यानंतर राजाला हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्यानं हायड्रोलिक तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात घेऊन जाण्यात आलं. लालबागचा राजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासह अनेक कोळी बांधवांच्या बोटी देखील आपल्या लाडक्या बाप्पाला खोल समुद्रात निरोप देण्यासाठी दाखल झाल्या. कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला अनोखी सलामी देखील दिली गेली. आज साडेदहा वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. बाप्पाला खोल समुद्रात नेऊन त्याचं विसर्जन करण्यात आलं. त्याचप्रमाणं बाप्पाचं खोल समुद्रात विसर्जन झाल्यानंतर तरफ्याचे नटबोल्ट काढण्यासाठी सहा ते सात स्कुबा डायव्ह देखील खोल समुद्रात पाठवण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर' या असा जय घोष करत 'लालबागचा राजा'ला निरोप देण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. 'मुंबईचा राजा' गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन; आतापर्यंत 19,996 गणपती बाप्पाला भाविकांचा निरोप - Ganesh Visarjan 2024
  2. गणेश विसर्जन 2024 : सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंताचं 'तांडव' नृत्य, बघण्यासाठी नाशिककरांची तोबा गर्दी - Ganesh Visarjan 2024
  3. ढोल-ताशाच्या गजरात पुणेकरांचा गणरायाला निरोप, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा ड्रोन व्हिडिओ - Pune Ganpati Visarjan 2024
Last Updated : Sep 18, 2024, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details