मुंबई Ganeshotsav 2024 :दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यां चाकरमान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास गिफ्ट दिलं आहे. शिंदे गटाकडून मोफत एसटी बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी दिली जाणार आहे. शनिवारी वर्षा बंगल्यावर या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
शिंदे गटाकडून मोफत बसची सोय (Source - ETV Bharat Reporter) दरवर्षी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जातात. तसेच खासगी वाहनातूनही मोठ्या प्रमाणात भाविक कोकणात आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणी प्रवास करीत असतात. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं दोन ते सात सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचं एसटी महामंडळानं जाहीर केलं. यात व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्येही ज्येष्ठ नागरिकांना 100% तर महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे.
एकूण 2031 जादा बस आरक्षित -2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यातील चाकरमान्यांनी बसला पसंती दिली आहे. 1301 गट आरक्षणासह एकूण 2031 जादा बस आतापर्यंत तिकीटं आरक्षित झाले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
कोकणात शिंदे गटाकडून मोफत बस :दरम्यान, एसटी महामंडळात पाठोपाठ कोकणातील गणेश भक्तांसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तालुक्यांमध्ये बस सोडल्या जाणार आहेत. "कोकणात 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस सेवा पुरवण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुकाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष यांना याबाबत नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून कोकणात शेकडो बसेस गणेश भक्तांसाठी जातील. दरवर्षी गणेश भक्तांना कोकणात जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असतो. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही सोय करून देणार आहोत," अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली.
हेही वाचा
- हर हर महादेव! पहिल्या श्रावणी सोमवारी भीमाशंकर मंदिरात भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ - Pune Bhimashankar Temple
- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पौराणिक मातृलिंग दर्शनासाठी गर्दी; वर्षातून केवळ पाच वेळाच मिळते दर्शनाची संधी, घ्या दुर्मीळ शिवलिंग दर्शन - Kolhapur Ambabai Temple
- पहिला श्रावण सोमवार; परळी वैजनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी - Shravan 2024