गडचिरोली : 28 लाख रुपये बक्षीस असलेल्या एक वरिष्ठ कॅडरच्या नक्षलसह एक एरिया कमिटी मेंबर आणि दोन सदस्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर सोमवारी (3 फेब्रुवारी) आत्मसमर्पण केलंय. अशोक सडमेक उर्फ चंद्रशेखर, वनिता झोरे, साधू मोहंदा आणि मुन्नी कोरसा अशी आत्मसर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत.
82 गुन्हे दाखल :अशोक उर्फ चंद्रशेखर (वय 63, रा. अर्कापल्ली, ता. अहेरी) हा नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेता असून त्याची पत्नी वनिता टेक्निकल टीमची सदस्य आहे. तर साधू आणि मुन्नी हेदेखील सदस्य आहेत. अशोकवर 82 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 31 चकमक, 17 जाळपोळ आणि 34 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर सरकारनं 16 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. तर वनिता हिच्यावर 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये एक चकमक, दोन जाळपोळ 8 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. तिच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस होतं. तसंच साधूवर चार गुन्हे दाखल असून त्याच्यावर चार लाखाचे तर मुन्नीवर दोन लाखांचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांच्या टीसीओसी (टेक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचं बोललं जातंय. कारण याच कालावधीमध्ये नक्षल चळवळ आक्रमक होत असते.
...त्यामुळं केलं आत्मसमर्पण : जवळपास 33 वर्षे नक्षल चळवळीत सहभागी होऊन काम केल्यानंतर हे करुन काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर अशोकनं आपल्या पत्नीसह आत्मसमर्पण करुन सन्मानानं जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला. जिल्हापोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळं नक्षलवाद्यांना शरण येण्याशिवार्य पर्याय राहिलेला नाही. त्यामुळं 'शॉट कट रुट सरेंडर' या मार्गानं दिपक, गिरिधर, तारक्का यांसारख्या वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. तसंच आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचं पोलीस दलानं पुनर्वसन घडवून आणल्यामुळं आजपर्यंत एकूण 695 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
- पोलीस अधीक्षक काय म्हणाले? : "माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना लोकशाही मार्गानं सन्मानाचं जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेन," असं पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले आहेत.
हेही वाचा -
- नक्षल नेत्यानं 28 वर्षांच्या हिंसक प्रवासाला दिला पूर्णविराम; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात - Giridhar With Wife Surrender
- गडचिरोलीत आशेचा नवा किरण; बंदूक, बॉम्बशी खेळणाऱ्या जहाल नक्षलवाद्यांना स्टील कंपनीत नोकरी
- देशातील 'हे' राज्य नक्षलमुक्त होण्याच्या वाटेवर, शेवटच्या नक्षलवाद्यानंही पत्करली शरणागती