अहिल्यानगर :चेष्टा सहन न झाल्यानं मित्राने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील मुकुंदनगर परिसरात घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या आठ तासात आरोपीला पुण्यातून अटक केली. मित्राचा खून केल्यानं एकच खळबळ उडाली. काहीकाळ या परिसरात तणावाचं वातावरण होतं. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही परप्रांतीय असून, ते चांगले मित्र होते.
मित्रावर वार केले :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबरला मुकुंदनगर या ठिकाणी आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान व जिशान रुस्तमअली खान हे दोघे मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ते एकमेकांची चेष्टा करत होते. आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान याला केलेली चेष्टा सहन न झाल्यानं त्याला राग आला आणि मित्रावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या त्या मित्रावर रुग्णालात उपचार सुरू होते. मात्र, 30 नोव्हेंबरला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपी पुण्यातून अटकेत : नसीबअली रुस्तमअली खान यांच्या तक्रारीवरुन, कॅम्प पोलीस स्टेशन येथे 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता. गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती समजली की, आरोपी हा पुणे येथे पळून गेला आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्यानं तपास पथकातील पोलीस हे आरोपी ताब्यात घेण्यासाठी पुणे येथे गेले होते. आरोपीला शिताफीने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 8 तासात ताब्यात घेऊन त्यास अटक केली. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
अहिल्यानगर पोलिसांची कारवाई : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिंदे, संदिप घोडके यांनी केली.
हेही वाचा -लिव्ह इन पार्टनरची हत्या करून दिली हरविल्याची तक्रार, पोलिसांनी गुन्ह्याचा 'असा' लावला छडा