ठाणे Thane Firing Case :डॉक्टरी व्यवसायातून दोन डॉक्टरमध्ये झालेल्या वादातून एका डॉक्टरने कट रचून साथीदारांच्या मदतीनं दुसऱ्या डॉक्टरांच्या कारवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. ही घटना मुरबाड-सरळगाव येथील श्रीकृष्ण हॉस्पीटलसमोर रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात (Murbad Police Station) गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे गोळीबार करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे 26 दिवसांनी चार आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. मात्र, मुख्य आरोपी डॉक्टरसह दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
अटक आरोपींची नावे: सुरेश पुंडलिक ओखोरे, (वय 32), भूषण ऊर्फ बबल्या पुंडलिक पवार, ( वय 23) दोघेही (रा.किन्हवली, ता.शहापूर) गौरव रामचंद्र तुंगार, (22 ), ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा जयवंत साबळे, (रा.सरळगांव) असे अटक चार आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी डॉ.रामचंद्र भोईर (रा.सरळगांव) यांच्यासह विजय वाघ, (रा.फर्डे धसई, ता.शहापूर) हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
असा रचला होता कट :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ.रवीशंकर पाल यांचा मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरळगाव येथे श्रीकृष्ण हॉस्पीटल आहे. तर याच परिसरात मुख्य आरोपी डॉ.रामचंद्र भोईर यांचेही हॉस्पिटल असून या भागात डॉ. पाल यांच्याकडं येणाऱ्या रुणांची संख्या अधिक असल्यानं आरोपी डॉ. भोईर यांच्याकडं रुग्ण कमी जात होते. यातूनच वाद होऊन डॉ. पालकडं असलेल्या अटक आरोपी गौरव तुंगार या कंपाउंडरशी आणि आरोपी लॉब चालक साबळे, या दोघाशी संगणमत करून डॉ. पालच्या व्यवसायवर परिणाम होईल असा कट रचला होता.
सीसीटीव्ही फुटेज दिसून घटना : याप्रमाणे अटक आरोपी ओखोरे आणि पवार या दोघांना गोळीबार करण्यासाठी सांगण्यात आले. त्यासाठी अटक आरोपी गौरव याने एक गावठी कट्टा (बंदूक) फरार आरोपी वाघ यांच्याकडून आणून गोळीबार करणाऱ्या दोघांना दिला. त्यातच डॉ. पाल हे श्रीकृष्ण हॉस्पीटलसमोर रस्त्यावर कार पार्किंग करून गेले असता, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात आरोपींनी कारवर गोळीबार करून पळून गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कारवर गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर डॉ. पाल यांनी 4 जुलै रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन भारतीय न्याय संहिता कलम 324(4) सह आर्म ॲक्ट कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता घटनस्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 1 जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास दुचाकीवरूनआलेल्या दोघा अज्ञात आरोपीनी गोळीबार केल्याचं दिसून आले.
गोळीबार केल्याची कबुली :गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती काढली असता सदरचा गुन्हा अटक आरोपी सुरेश पुंडलिक ओखोरे, भूषण ऊर्फ बबल्या पुंडलिक पवार, यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं त्यांना मोठया शिताफीनं पकडून चौकशी केली असता सदरचा गुन्हा अटक कंपाउंडर गौरव तुंगार आणि लॉब चालक ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा जयवंत साबळे यांच्या सांगण्यावरून केल्याचं कबुल केलं. त्यानंतर दोघांनाही तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडं चौकशी केली असता सदरचा गुन्हा मुख्य आरोपी डॉ.रामचंद्र भोईर यांच्या सांगण्यावरून केल्याचं कबुल केले. तसेच आरोपी गौरव तुंगार याने सदर गुन्हयात वापरलेले अग्नीशस्त्र एक गावठी कट्टा (बंदुक) त्याचा मित्र विजय वाघ, याचेकडून आणले असल्याचं सांगितलं. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे.
दोन दिवसाची पोलीस कोठडी :अटक आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले अग्नीशस्त्र एक गावठी कट्टा (बंदूक) व एक मोटरसायकल जप्त केली आहे. गुन्ह्यातील 4 आरोपीना 26 जुलै रोजी अटक केली असून आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे. तसेच फरार मुख्य आरोपीसह दोघांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही सांगितलं. विशेष म्हणजे सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना ग्रामीणचे एसपी डॉ.डी.एस.स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी जगदिश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास पथक पोउपनिरीक्षक व्ही.एस.पवार, एन.पी.निंबाळकर, पो.उप निरीक्षक, एस.जे.खतीब, पो.हवा. आर. एम. शिंदे, पोलीस नाईक डी.बी.हिंदूराव, गावडे, देवरे, आगिवले, तडवी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकिस आणला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक, व्ही.एस.पवार करत आहेत.
हेही वाचा -
- राजुऱ्यात फिल्मी स्टाईलनं हत्या; एक वर्षांपूर्वी झाला गोळीबार, आरोपीनं त्याच दिवशी त्याच वेळी घेतला बदला - Rajura Gun Shot Death Case
- बसपा नेते के आर्मस्ट्राँग हत्या प्रकरण : पोलिसांनी केलं मारेकऱ्याचं एन्काऊंटर - Rowdy Encounter in Chennai
- कोठडीत असलेल्या गणपत गायकवाड यांना मतदान करण्यापासून रोखावं; काँग्रेसचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र - MLC ELECTION VOTING