मुंबई-मागील आठवड्यापासून प्रकृती खालावल्यामुळं माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला भिवंडीतील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कांबळीची प्रकृती कशी आहे? त्याला डिस्चार्ज कधी मिळणार आहे? याबाबत ‘ईटीव्ही भारत’चे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे याची घेतलेली विशेष मुलाखत (Vinod Kambli exclusive interview ).
भारताचा माजी डावखुरा शैलीदार फलंदाज विनोद कांबळीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृती स्थळाच्या अनावरणप्रसंगी दिग्गज उपस्थित होते. यावेळी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची झालेली भेट पाहून अनेकांचे डोळे पाणावले. कधी काळी फलंदाजी करताना नजाकतीने फिरणारे विनोद कांबळीचे हात या भेटीदरम्यान थरथरत होते. टीममधला सर्वात जास्त बोलणारा, छान गाणारा, पोथडीतल्या विनोदांनी सहकाऱ्यांना हसवणारा विनोद कुठे तरी हरवल्यासारखा वाटत होता. त्याला खूप बोलायचं होतं. पण ओठातून शब्द फुटत नव्हते. या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विनोद कांबळीबाबत मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट निर्माण झाली. या प्रसंगानंतर काही दिवसांनी विनोद आजारी पडला. तेव्हा विनोद कांबळीच्या फलंदाजीचे फॅन असलेल्या आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांनी स्वखर्चाने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली.
क्रिकेटपटू विनोद कांबळी मुलाखत (Source- ETV Bharat)
मी लवकरच मैदानावर परतणार-विनोद कांबळीला पुन्हा क्रिकेट खुणावत आहे. " माझी आता तब्येत ठीक असून मला लवकरच इथून सोडणार आहेत. माझ्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. मला इथे येऊन घेणारे हॉस्पिटलचे संचालक शैलेश ठाकूर हे माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी मला इथे आणलं. सर्व काही माझ्यावर मोफत उपचार करत आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे,"असे भावोत्कट उद्गार विनोद कांबळीने काढले.
" मी भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये एक-दोन वेळा नाही तर तब्बल 9 वेळा कमबॅक केलं आहे. आता माझी तब्येत लवकरच बरी होणार आहे. मी लवकरच तुम्हाला मैदानावर एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे," असा विश्वास यावेळी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळेनं ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. "नवोदित पिढीला घडविण्यासाठी त्यांना क्रिकेटचे धडे देण्यासाठी मी प्रशिक्षक म्हणून मुलांना क्रिकेट शिकवणार आहे. नवीन मुलांना क्रिकेटचे धडे देणार आहे," अशी माहिती विनोद कांबळीने दिली.
कुटुंबावर आणि सचिनवर माझे प्रेम-सचिन तेंडुलकरबरोबरच्या मैत्रीबद्दल काय सांगाल, असा प्रश्न विनोद कांबळी यांना विचारला असता, “आयल्ला...” अशी उत्सूर्फत प्रतिक्रिया कांबळीनं दिली. "माझे सचिनवर खूप प्रेम आहे. सचिननं मला खूप पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी त्याच्या प्रेमाखातर माझ्या हातावर सचिनच्या नावचा टॅटू काढला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. मी माझ्या पत्नीच्या नावचा टॅटूही हातावर काढला आहे," यावेळी कांबळीनं सांगितले. "या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि पाठिब्यामुळं मी आहे. आता मी लवकरच बरा होऊन परणार," असा विश्वास कांबळींनी व्यक्त केला.
मुलगा क्रिकेटमध्ये येणार-"मी डावखुरा फलंदाज होतो. माझी बॅटिंग क्रिकेटप्रेमींना आवडायची. तर आता माझा मुलगाही लेफ्टी बॅट्समन आहे. तोही आता क्रिकेटचा सराव करतोय. माझ्यासारखीच त्याची बॅटिंग आहे. तोही लवकरच तुम्हाला भारतीय संघात दिसेल," असा आशावाद विनोदने बोलून दाखवला.
विनोद कांबळीच्या मदतीकरिता हात सरसावले-विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याचं समजताच भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलचे संचालक शैलेश ठाकूर यांना त्यांनी रुग्णालयात दाखल करून मोफत उपचार करण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले, " विनोद कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुढील एक-दोन दिवसात कांबळीला डिस्चार्ज देण्यात येईल. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून विनोद कांबळीच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर आमदार प्रताप सरनाईक यांनीही 20 लाख रुपयांची मदत विनोद कांबळीला देऊ केली आहे.
हेही वाचा-
- विनोद कांबळीचा रुग्णालयात भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ
- माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचा व्हिडिओ पाहताच, 'फॅन' डॉक्टरांनी केले मोफत उपचार