बुलढाणा :तालुक्यातील येळगाव इथले शेतकरी विष्णू गडाख गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अर्धा एकर जमिनीमध्ये 45 प्रकारच्या विदेशी भाजीपाल्याचं पिक घेत आहेत. यातून त्यांना दरमहा 25 ते 30 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्यांच्या या अभिनव प्रयोगानं त्यांना वार्षिक लाखोंचं उत्पन्न मिळतं. यामुळं जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
'तो' निर्णय देतोय लाखमोलाचं उत्पन्न :येळगाव इथले शेतकरी विष्णू गडाख यांनी बी.एची पदवी घेतली आहे. त्यांनी चार ते पाच चित्रपटात काम केलं आहे. परंतु, पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्यानं गडाख यांनी अर्धा एकर शेतात भाजीपाला शेती करणं पसंत केलं. देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणाऱ्या घसरणीमुळं कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यामुळं गडाख यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा 10 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आज लाखमोलाच्या उत्पन्नाचा स्रोत बनला आहे.
स्वत:च करतात भाजीची विक्री :विष्णू गडाख पदवीधर असूनही त्यांनी शेतीमध्ये नशीब आजमावलं. त्यांनी शिक्षण आणि मोबाइलच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेत, विदेशी पालेभाज्यांचं उत्पादन सुरू केलं. पारंपरिक शेती करत मोठे झालेल्या विष्णू गडाख यांचा प्रयोगशील दृष्टिकोन विकासाचा मार्ग सुकर करणारा ठरला आहे. शेतकरी आपला शेतमाल व्यापारी आणि दलालांना विकतो. मात्र, ज्या दरात शेतकरी शेतमाल विकतो त्याच्या तिप्पट दरानं व्यापारी त्याची विक्री करतो. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. हीच बाब लक्षात घेऊन गडाख स्वत:च दुकान थाटून भाजीपाला विक्री करतात.