पालघर : डहाणू तालुक्यातील बोर्डीनजीकच्या खुनावडे गावात पुन्हा एकदा उडता सोनसर्प (Flying Snake) आढळून आलाय. यामुळं सर्प मित्रांमध्ये कुतूहल निर्माण झालय. फार क्वचितच दिसणारा हा साप महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोकण, आंबोली घाट या भागात प्रामुख्यानं आढळतो. या सापाला शेलाटी आणि इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक (Ornate Flying Snake) (शास्त्रीय नाव: क्रिसोपेलिया ओर्नाटा) म्हणतात.
दुर्मीळ सापाचे पूर्वीही अस्तित्व : खुनावडे गावात दिनेश शेट्टी यांच्या फार्म हाऊसमध्ये हा साप आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभाग आणि ‘वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन’ची ‘रेस्क्यू टीम’ याठिकाणी पोहोचली. रेस्क्यू दरम्यान हा दुर्मीळ सोनसर्प असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तर आत्तापर्यंत पालघर जिल्ह्यात पसरलेल्या पश्चिम घाटातील जंगलात या दुर्मीळ सर्पाच्या प्रजातीची नोंद झालेली नसल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आलीय. मात्र, काही वर्षांपूर्वी बोर्डी गावातील चिकूवाडी आणि अस्वाली येथे सोनसर्प स्थानिकांनी पाहिला होता. पर्यावरण प्रेमी, प्राणीमित्र सूर्यहास चौधरी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.
सर्प संग्रहालयाची गरज :"या जातीच्या सापाला पंख नसतात. मात्र, उंच झाडावरून कमी उंचीच्या झाडापर्यंत पोहचण्यासाठी, तो त्याचे शरीर चपटे करतो. त्यामुळं काही अंतर तो सहज पार करू शकतो," असं चौधरी यांनी सांगितलं. तर सुटका केलेल्या सापाला स्थानिक जंगलात सोडावं. या भागात आढळणाऱ्या सापांच्या नोंदी आणि अभ्यास करण्यात यावा, उडत्या सोन सापांच्या संरक्षण आणि संवर्धनाची मोहीम राबवण्यात यावी. तसंच सर्प संग्रहालय उभारण्याची मागणी सर्पमित्रांनी केली आहे.
एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या : या सापाला मराठीत तिडक्या साप, उडता साप, शेलाटी, उडता सोनसर्प अशी नावं आहेत. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. तो फांद्यांतून लांब उड्डाणवजा उड्या मारू शकतो. तो सूर्यप्रकाशात चमकतो म्हणून याला उडता 'सोनसर्प' असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीपर्यंत हे साप आढळून येतात. या सापाची ‘पॅरेडाइज फ्लाइंग स्नेक’ नावाची उपजात अंदमान बेटातील नारकोश डॅम येथे आढळून येते.
"सापाच्या आरोग्य तपासणीसाठी ठाणे येथे पाठवण्यात आला आहे. तिथून आणल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल."- प्रियंका पाटील, सहायक वन संरक्षक, डहाणू
पाठीवर खवले : उडता सोनसर्प हा लहान तसंच मध्यम आकाराचा असून अंगानं काठीसारखा गोल, सडपातळ आणि पाठीवर गुळगुळीत खवले असतात. याच्या पाठीवरच्या भागावर काळ्या, पिवळ्या आणि तांबड्या रंगाची चकचकीत नक्षी असते. तर त्याचा खालचा भाग हिरवट असतो. सरपटताना त्याच्या पोटाकडील बाजूच्या खवल्यांना घड्या पडतात. झाडावर चढण्यासाठी त्याला अशा खवल्यांचा उपयोग होतो. त्याच्या डोक्यावरही चकचकीत पट्टे असतात. डोके आणि अंगावरील ही नक्षी अधिवासानुसार वेगवेगळी असते.
पश्चिम घाटात अधिवास : सर्प तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या जातीची मादी सहा ते बारा अंडी देते. त्यांनी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात अंडी घातलेली निदर्शनास आली आहेत. उडत्या सोनसर्पचे भक्ष्य बेडूक, सरडे, पाली, लहान पक्षी आणि त्यांची अंडी आहेत. पश्चिम घाटात हे साप आढळून आले आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अधूनमधून हा उडता सोनसर्प आढळतो. अगदी सोलापूरसारख्या ओसाड भागात हा काही काळापूर्वी आढळला होता.
हेही वाचा -
- बापरे बाप! देव्हाऱ्यात निघाला भलामोठा साप, पाहा व्हिडिओ
- अरे बाप रे! रेल्वेच्या एसी बोगीत निघाला साप; प्रवाशांची तारांबळ, दुसऱ्या डब्यात केलं शिफ्ट - Snake Spotted inside Train
- बायकोला झाला सर्पदंश; गावाच्या रस्त्यावर चिखल, पतीने बायकोला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून केली नदी पार - Snake Bite Woman