महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गटारी पार्टी' बेतली जीवावर : 5 मित्र गाडीसह नदीत गेले वाहून, एकाचा मृत्यू, एकजण बेपत्ता; तीन जण बचावले - Five friends drowned in Tansa Dam

Five friends swept away : निसर्गाच्या सानिध्यात पार्टीला जाणं मित्रांना चांगलंच महागात पडलंय. तानसा धरणाच्या खाली एका पार्टीला पाच मित्र गेले होते. धरणाच्या गेटजवळ पार्टी करताना पाच मित्र तानसा नदीत कारसह वाहून गेले. त्यातील तिघांनी कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र कारमध्ये दोघे जण अडकले. यातील एकाचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला आहे. मात्र एक जण अद्याप बेपत्ता आहे.

Five friends swept away
बचाव करताना गावकरी (Etv Bharat Reporte)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 8:13 PM IST

Updated : Aug 3, 2024, 8:54 PM IST

ठाणेFive friends swept away :गटारी दारू पार्टी पाच मित्रांच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली. धक्कादायक बाब म्हणजे पाच मित्र कारमध्ये बसून धरणाच्या मुख्य प्रवाह असलेल्या गेटजवळ पार्टी करत होते. त्याचवेळी तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यामुळं पाच मित्र कारसह नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला आहे. मात्र, त्यातील एकजण बेपत्ता आहे. बाकीच्या तिघांनी कारमधून बाहेर पडत कसाबसा आपला जीव वाचवलाय. गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण), असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

बचाव करताना गावकरी (Etv Bharat Reporte)

अशी घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार तसंच रविवार सुट्टी असल्यानं गटारी साजरी करण्यासाठी पाच मित्र पार्टीसाठी तानसा नदीवर आले होते. ते सर्वजण कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात कारनं आले. तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून ते पार्टी करत होते. त्याचवेळी तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. त्यात ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील तिघांनी कार बाहेर उड्या मारल्यानं त्यांचा जीव वाचला. मात्र, दोन मित्र गाडीतच अडकले. या पैकी गणपत चिमाजी शेलकंदे यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला. मात्र, एकजण आद्याप बेपत्ता आहे. त्यांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिलीय.

पर्यटकांना पिकनिकसाठी बंदी :पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना पिकनीकसाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली आहे. तरीसुद्धा काही पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी पार्टीसाठी जात असल्याचं दिसून येतय. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसापासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणातून पाण्याचा विर्सग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळं नदी काठच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाय. त्यातील काही अतिउत्साही पर्यटक मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.

Last Updated : Aug 3, 2024, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details