पुणे :थोड्याचं दिवसांत देशात लोकसभेचं बिगूल वाजणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांत उमेदवारांची मोठी रांग लागलेली आहे. यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत फक्त पुणे जिल्ह्यातून तब्बल पाचजण इच्छूक आहेत. त्या इच्छूकांची नावं पुणे लोकसभेचे प्रभारी अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे दिले आहेत. सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तसंच, त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्ष म्हणजेच महायुतीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. तर, विरोधकांची ''इंडिया आघाडी'' देखील जोरदार तयारीला लागलेली पाहायला मिळत आहे. सध्या ''राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा'' सुरू आहे.
मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरेंकडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपवले आहे. अमित ठाकरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. वेळोवेळी त्यांनी पुण्यात बैठका देखील घेतल्या आहेत. अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे इच्छुकांची नावं सुपूर्द केली असून, यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, पक्षाचे नेते बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते, या नावांचा यामध्ये समावेश आहे.
मनसेमध्ये पुणे लोकसभेसाठी चुरस : अमित ठाकरे यांनी दिलेल्या नावांमध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसंच, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी याआधीच इच्छा व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे बाबू वागसकर हे देखील पक्षाचे नेते आहेत. तर, किशोर शिंदे यांनी कोथरूड येथून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. गणेश सातपुते हे देखील पुणे मनसेमध्ये मोठे नाव असल्याने आता मनसेमध्ये पुणे लोकसभेसाठी चुरस पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे मनसेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.