मुंबईFishing :दोन महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मत्स्यव्यवसायात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. या नवीन मासेमारी हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. यासाठी किनाऱ्यावर उभ्या असलेल्या मासेमारी नौका समुद्रात आणण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी मच्छिमारांनी चांगली तयारी केली असून नौका रंगवल्या आहेत.
माशांचा प्रजनन काळ : सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळं मत्स्य उत्पादन वाढीसाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो. या काळात मासेमारीसाठी नौकांवर बंदी घातली जाते. सरकारनं घातलेली मासेमारी बंदी 1 ऑगस्टपासून उठवली जाणार आहे. मच्छीमारांना हवामानाचा अंदाज घेऊन मासेमारीच्या वेळेचे नियोजन करावं लागतंय. 1 ऑगस्ट रोजी बंदी उठवली जाणार असली तरी समुद्र शांत नसल्यामुळं बहुतांश मच्छीमार पौर्णिमेलाच हंगाम सुरू करतात. महाराष्ट्राच्या सातही सागरी जिल्ह्यांमध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून मासेमारी करण्यात येणार आहे.
अवैध मासेमारीमुळं मच्छीमार चिंतेत :गतवर्षीचा मासेमारी हंगाम चांगला नव्हता. त्यामुळं मच्छीमार चिंतेत आहेत, पर्सन्सीन नेट मासेमारी, एल.ई. मासेमारी बंदी कालावधीत डी पद्धतीची अवैध मासेमारी तसंच अवैध मासेमारीमुळं समुद्रातील मासळीचा साठा संपुष्टात आल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे. नवीन हंगामात मासेमारी नौका सुरू करण्यासाठी लागणारे आर्थिक भांडवल कोठून आणायचं, असा प्रश्न मच्छीमारांसमोर आहे. महाराष्ट्र शासनानं डिझेल परताव्याला मंजुरी दिली आहे. त्यातून मत्स्यव्यवसाय विभागाला निधी मिळाला असून काही तांत्रिक अडचणींमुळं मच्छीमारांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, असं वर्सोव्याचे मच्छीमार नेते प्रदीप टपके यांनी सांगितलं.
मासेमारीसाठी उशिरा निघणार : राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्यास परवानगी दिलीय. ऑगस्टमधील वादळी वारे लक्षात घेता मासेमारीसाठी थोडा उशीरच निघण्याकडं मच्छिमारांचा कल आहे. वर्सोव्यातील 250 मासेमारी नौकांपैकी काही बोटी 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज असल्याची माहिती वर्सोवा नाखवा मंडळाचे सचिव पराग भावे यांनी दिली. वर्सोवा नाखवा मंडळाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज चंडी म्हणाले की, पर्यावरणातील बदल, पश्चिम किनारपट्टीवर उशिरा सुरू झालेला पाऊस लक्षात घेऊन मासेमारी बंदीचा कालावधी 10 जून ते 14 ऑगस्ट असा असावा, अशी बहुसंख्य मच्छीमारांची मागणी आहे. यावर्षी मासळीचा हंगाम चांगला असावा, कोळंबी, पापलेट, हलवा सुरमई, माकुळ आदी भरपूर मासे मच्छीमारांच्या जाळ्यात यावेत, यासाठी मच्छिमारांनी चांगली तयारी केलीय.