नांदेड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या हत्येच्या निषेधार्थ परभणीत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. सकल ओबीसी समाज मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सकल ओबीसी समाजानं माळाकोळी पोलीस ठाण्यासमोर (Malakoli Police Station) ठिय्या आंदोलन केलं. ओबीसी समाजाच्या आंदोलनानंतर मनोज जरांगे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगेंच्या विरोधात गुन्हा दाखल: लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परभणी येथील मोर्चात धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबाबत जरांगे पाटील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 356(2) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल (ETV Bharat Reporter) मोर्चात मनोज जरागेंचं प्रक्षोभक भाषण : 4 जानेवारी रोजी परभणी येथे मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. या मोर्चात मनोज जरागे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप माळाकोळी येथील वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. तसंच मंत्री धनंजय मुंडे यांनी वंजारी समाजाचा अवमान केल्याचा आरोप सकल ओबीसी समाजानं केला.
संतोष देशमुख कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट :बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटून उठलंय. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात मोर्चे, आंदोलनं, बंद पुकारले जात असून मंगळवारी (7 जानेवारी) देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा -
- दादा कन्फ्युज! अजित पवारांच्या 'त्या' विधानाचा एकनाथ खडसे यांच्याकडून समाचार
- संतोष देशमुख कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी; संभाजीराजेंचं टीकास्त्र
- भाजपा लोकशाहीच्या मुळावर उठलेला पक्ष; अरविंद केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न चुकीचा, संजय राऊतांचा हल्लाबोल