जळगाव Father Son Built Electric Bicycle : जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एका शेतकरी कुटुंबातील बाप लेकाच्या जोडीनं इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. त्यामुळं सध्या ते चर्चेत आले आहेत. निलेश पाटील आणि मानस निलेश पाटील (वय 14) अशी या बाप लेकांची नावं आहेत.
14 वर्षीय मुलानं वडिलांच्या मदतीनं बनवली इलेक्ट्रिक सायकल (ETV Bharat Reporter) इलेक्ट्रिक वाहन महाग असल्यानं घरीच बनवली सायकल : इलेक्ट्रिक वाहन बघून मानसच्या मनात देखील इलेक्ट्रिक वाहन घरीच बनवण्याची कल्पना आली. घरची आर्थिक परिस्थिती नसतानाही तडजोड करून त्यानी या कल्पनेला सत्यात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. घरात असलेल्या आपल्या जुन्या सायकलवर त्यानं काम सुरू केलं. मानसच्या या कल्पनांना भरारी देण्यासाठी त्याच्या वडिलांनी देखील त्याची साथ दिली.
सायकलचे वैशिष्ट्य : इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मानस पाटीलला ही सायकल बनवण्यासाठी जवळपास 11 हजार रुपयांचा खर्च आलाय. या सायकलमध्ये इलेक्ट्रिक मोटर लावण्यात आली असून ही सायकल जवळपास पाच तास चार्जिंग केल्यानंतर चक्क 25 किलोमीटर धावते. या सायकलला दुचाकी प्रमाणे हॉर्न, लाईट आणि इन्स्टंट ब्रेकची सुविधा देखील त्यानं दिली आहे. दुचाकीप्रमाणे ही सायकल आपण वापरू शकतो. त्याचबरोबर ही सायकल प्रदुषण विरहित असल्याची माहिती मानसनं दिली. तसंच भविष्यात त्याला इंजिनियर होऊन नवीन कल्पनांवर काम करायची इच्छा असल्याचंही मानसनं सांगितलंय.
शेतकरी वडिलांनी केली मदत : मानसनं तयार केलेली इलेक्ट्रिक सायकल अनेक विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं मत त्याचे वडील निलेश पाटील यांनी व्यक्त केलय. निलेश पाटील हे स्वतः एक शेतकरी आहेत. ते दहावी उत्तीर्ण असून त्यांनी आयटीआय केलाय. तर मानसची आई ब्युटी पार्लर चालवते. मानसनं इलेक्ट्रिक सायकल बनवण्याची कल्पना आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याला आर्थिक तडजोड करून उपकरणं उपलब्ध करून दिली. त्यानंतर बाप लेकाच्या या जोडीनं अवघ्या पाच दिवसात ही इलेक्ट्रिक सायकल तयार केली. त्यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा -
- पिकांसाठी वरदान ठरतय खास 'पंचामृत'; जनावरं देखील फिरकत नाहीत शेतात - Buldhana Panchamrut
- वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या 'सुपरफास्ट प्रवासात' नवं संशोधन! एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली हायपरलूपची निर्मिती - Hyperloop technology research