महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेते निवडणुकीत मश्गुल असताना रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, चार महिन्यात 838 बळाराजांनी संपविली जीवनयात्रा - Farmers Suicide in Maharashtra

FARMERS SUICIDE IN MAHARASHTRA राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू आहे. राज्यात जानेवारी आणि एप्रिल महिन्यांत सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण आहे.

FARMERS SUICIDE IN MAHARASHTRA
फाईल फोटो (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 12:50 PM IST

Updated : Jun 26, 2024, 3:09 PM IST

मुंबई FARMERS SUICIDE IN MAHARASHTRA:उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाला संबोधले जाते. प्रत्यक्षात बळीराजाच दिवसेंदिवस मृत्यूच्या दारी लोटला जात असल्याचं चित्र दिसत आहे. सतत नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. लोकसभा निवडणुकांमध्ये नेतेमंडळी मश्गुल होते. राज्यात आचारसंहिता लागू असताना आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जानेवारी ते एप्रिल २०२४ या अवघ्या चार महिन्यांत ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या (ETV Bharat)

२०२३ पासूनच राज्यात तीव्र पाणीटंचाई:मुंबईमध्ये गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्यानं ऑक्टोबर २०२३ पासूनच राज्यात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि गुरांना चारा छावण्याची कमतरता निर्माण झाली. शेतकऱ्यांनी यावेळी राज्य सरकारला वारंवार साकडे घातले. पाणी आणि चारा छावण्या उभारण्यासाठी निवेदन देण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात शासन, प्रशासन व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात याचे पडसाद उमटले. दुसरीकडे शेतकऱ्यांचे पाणी आणि चारा छावण्याविना हाल होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. गेल्या चार महिन्यात सुमारे ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद राज्य सरकारच्या दप्तरी झाली आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या:सरकारी आकडेवारीनुसारराज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात ८४, तर नाशिक विभागात ९७, पुणे विभागात केवळ ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोकणात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही.

आत्महत्याग्रस्तांना मदतीची प्रकरणे प्रलंबित:मदत आणि पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी सांगितले की, "जानेवारी ते एप्रिल या कालावधीत जिल्हास्तरीय समित्यांकडून शेतकरी आत्महत्येची ८३८ प्रकरणे प्राप्त झाली असल्याची माहिती दिली. यात १७१ शेतकरी आत्महत्याची प्रकरणे वैध ठरवण्यात आली आहेत. १०४ शेतकरी कुटुंबांना राज्य शासनाच्या योजनेंतर्गत प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर ६०५ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. ही प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच कर्जाचा बोजा, कर्ज फेडण्यास असमर्थता आणि पीक अपयशामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाच आर्थिक मदत दिली जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे काम सुरू असल्याची माहिती संजय धारूरकर यांनी दिली आहे.

असे आहे राज्यातील आत्महत्येचं प्रमाण:राज्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, अहमदनगरमधील १५ पैकी १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

  • महिनानिहाय आकडेवारी:राज्यात जानेवारी महिन्यात २३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य सरकारच्या या आकडेवारीनुसार दररोजची सरासरी काढली असता दररोज सात शेतकरी मृत्यूला जवळ करत असल्याचं वास्तव आहे.

आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.

हेही वाचा

Last Updated : Jun 26, 2024, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details