मुंबई Uddhav Thackeray : मंगळवारी उद्या (4 जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असताना राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 20 मे रोजी मुंबई आणि उपनगरात मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. आचारसंहितेचा भंग केला म्हणून भाजपा नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली असून, उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. त्यामुळं आता याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
का घेतली पत्रकार परिषद? : 20 मे रोजी मुंबईसह 13 ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले. यावेळी मुंबईतील अनेक भागात संथगतीचं मतदान सुरु होतं. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित झाल्याचे प्रकार घडले. हे मुद्दामहून केलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्या ठिकाणी संथगतीनं मतदान सुरू आहे, तिथे मतदान करण्याची वेळ वाढवून मिळावी असं म्हणत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावरती बोट ठेवत ठाकरेंनी टीका केली होती. यानंतर मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेणं हे आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली होती. तसेच याबाबत उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेलारांनी तक्रारीत केली होती.
पत्रकार परिषद भोवणार? : आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं गंभीरित्या घेतल्याचं दिसतंय. तक्रार केल्यानंतर त्यातील सत्यता पडताळून निवडणूक आयोगानं पाहिली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला असं निवडणूक आयोगानं म्हणत त्यांच्यावर कारवाई करावी करण्याचं आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार का? उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.