मुंबई ED summoned Ravindra Waikar : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीनं गुरुवारी रवींद्र वायकर यांना तिसऱयांदा समन्स बजावलं आहे. 29 जानेवारीला चौकशीसाठी वायकर यांना बोलाण्यात आलंय. याआधीही वायकर यांना दोनवेळा ईडीनं समन्स पाठवलं होतं.
तिसऱ्यांदा पाठवले समन्स : पाचशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं 23 जानेवारीला रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीनं रवींद्र वायकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा 25 जानेवारीला तिसऱ्यांदा ईडीनं वायकर यांना समन्स पाठवलं आहे. येत्या 29 जानेवारीला रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलंय.
सात ठिकाणी ईडीनं टाकले होते छापे : 500 कोटींच्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी आमदार रवींद्र वायकर यांना 17 जानेवारीला समन्स बजावून बोलावलं होतं. मात्र, त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, त्यांना मुदतवाढ न देता ईडीनं पुन्हा समन्स बजावून 23 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याचप्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीनं 7 ठिकाणी छापे टाकले होते.
500 कोटींचा घोटाळा : रवींद्र वायकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केलं. आरक्षित भूखंडावर क्लब आणि आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला होता. हा 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमैया यांनी केला होता. सोमैया यांच्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेनंही प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -
- 'वंचित' महाविकास आघाडीसोबत; 48 जागांवर एकत्र लढण्याचा निर्धार, पुढील बैठक 30 जानेवारीला
- बंधूंना मिळालेल्या ED नोटीसीवरुन संजय राऊत कडाडले, नेमकं काय म्हणाले? वाचा