महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यात्रा-जत्रांच्या हंगामात तमाशांची सुपारी अडकली आचारसंहितेच्या कात्रीत, वेळेच्या निर्बंधामुळे बुकींग थंडावलं - Tamasha Fad Booking - TAMASHA FAD BOOKING

Tamasha Fad Booking : सध्या ग्रामीण भागात ग्रामदैवताच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. यात्रांमध्ये करमणुकीसाठी तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. मात्र, यंदा तमाशांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसत आहे. वेळेच्या बंधनामुळे रात्रीच्या तमाशा खेळावर गदा आली असून तमाशांच्या बुकिंगवर परिणाम झाला आहे.

Satara Tamasha Fad
सातारा तमाशा फड

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 9:03 PM IST

Updated : Apr 12, 2024, 9:13 PM IST

साताऱ्यातील तमाशा फडमध्ये जाणवत असलेला शुकशुकाट

सातारा Tamasha Fad Booking : ग्रामीण भागात ग्रामदैवताच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. यात्रांमध्ये करमणुकीसाठी तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. मात्र, यात्रांमधील तमाशांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे. वेळेच्या निर्बंधामुळे रात्रीच्या तमाशा खेळावर गदा आली आहे. परिणामी, तमाशाची सुपारी देण्यासाठी येणाऱ्या गावपुढाऱ्यांचा तमाशा पंढरीतील ओघ कमी झाला आहे. तसेच पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणारं तमाशांचं बुकींग देखील थंडावलं आहे.


तमाशा फड मालकांना सुपारीची प्रतीक्षा :ढोलकीवर थाप, टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट आणि पायात वजनदार चाळ बांधून गावच्या जत्रेत मनोरंजन करणाऱ्या नर्तकी, असा लोककलेचा अस्सल नजराणा ग्रामीण भागातील यात्रांच्या तमाशात पाहायला मिळतो. तमाशाची सुपारी ठरवण्यासाठी तमाशा पंढरीतच जावं लागतं. साताऱ्यातील कराडमध्ये तमाशा फड मालकांनी पठ्ठे बापूराव तमाशा पंढरीत राहुट्या ठोकल्या आहेत. मात्र, फड मालकांना तमाशांच्या सुपारींची प्रतीक्षा करावी लागत आहे.


वेळेच्या बंधनाचा तमाशा बुकिंगवर परिणाम :तमाशा लोककलेला आचारसंहितेचा किती फटका बसलाय, हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने तमाशा पंढरीचे अध्यक्ष चंद्रकांत हिंगमिरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, चैत्र महिन्यात यात्रांचा हंगाम बहरत असतो. त्यामध्ये झाडाखालच्या तमाशाचे कार्यक्रम ठेवले जातात. एक महिनाभर हा हंगाम असतो; परंतु यंदा निवडणूक असल्यानं रात्री 10 पर्यंत वेळेचं बंधन घातलं आहे. तमाशातील व्हारायची शो आणि वगनाट्य हे दोन्ही भाग पाहायची लोकांची इच्छा असते. परंतु, वेळेच्या बंधनामुळे संपूर्ण कार्यक्रम सध्या दाखवता येईना. याचा परिणाम बुकींगवर झाला असून फड मालक आणि कलावंतांवर अर्थिक संकट आलं आहे.


रात्री बारापर्यंत वेळ वाढवून द्या :यंदाचा यात्रा जत्रांचा हंगाम आचारसंहितेच्या कात्रीत सापडल्यामुळं तमाशा हंगामातील उलाढाल थंडावली असल्याची माहिती तमाशा फड मालक सुदाम साठे-म्हासोलीकर यांनी दिली. साठे पुढे म्हणाले की, आचारसंहितेमुळं सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंतच वेळ दिली आहे. या वेळेत व्हारायटी शो आणि वगनाट्य पूर्ण होत नाही. त्यामुळं दोन वेळच्या कार्यक्रमाची सुपारी घेऊन कोणी येईना. फक्त सकाळचा एकच कार्यक्रम होत असल्यानं फड मालक आणि कलावंतांचं अर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

फड मालकांसमोर कर्ज फेडायची चिंता :खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन फड मालक तमाशा फड चालवतात. एका तमाशा फडात 20 ते 25 कलावंत असतात. महिनाभराचा हंगाम संपल्यानंतर पुढचे 11 महिने कलावंत बसून असतात. महिनाभर चांगले कार्यक्रम झाले तरच फड मालक आणि कलावंतांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. मात्र, यंदा आचारसंहितेमुळं तमाशा पंढरीतील उलाढाल थंडावली आहे. सावकाराकडून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं, ही चिंता फड मालकांना लागून आहे. कलावंतांवर तर उपासमारीची वेळ येतेय की काय, अशी एकंदर तमाशा पंढरीतील परिस्थिती आहे.


'ही' आहे राज्यातील करमणूक केंद्रांची आकडेवारी :हंगामी तमाशा मंडळं (80), पूर्णवेळ (तंबूतील) तमाशा मंडळं (25), खडी गंमत तमाशा मंडळं (60), नमन (दशावतार) मंडळं (40), झाडीपट्टी नाटकं (40), संगित बारी (जलसा) केंद्रं (200), शाहीरी मंडळं (100), नाटक कंपन्या (35), विधी नाट्य (216), सर्कस (1), टुरींग टॉकीज (50).

हेही वाचा :

  1. सर्व नेते गुंतले लोकसभेच्या मैदानात! शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र आत्महत्या; वाचा 'ईटीव्ही'चा खास रिपोर्ट - Farmers Suicide in Maharashtra
  2. गर्दी न जमल्यानं झाला वाद; माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी - Amravati Lok Sabha Constituency
  3. मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार का? गजानन किर्तीकरांनी थेटच सांगितलं... - Gajanan Kirtikar
Last Updated : Apr 12, 2024, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details