अमरावती Tattoo of Dr Babasaheb Ambedkar : अमरावती शहरातील इर्विन चौकात मंगळवारी सकाळपासूनच रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये चक्क कपाळावर जय भीम अशा उल्लेखासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा टॅटू चक्क कपाळावर गोंदवलेली व्यक्ती सर्वांचंच आकर्षण ठरली. आपल्या कपाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू गोंदवणाऱ्या व्यक्तीबाबत 'ईटीवी भारत'नं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बाबासाहेब आदर्श असून त्यांच्याबाबत ही एक श्रद्धा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दोन महिन्यापूर्वी काढला टॅटू : कपाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं टॅटू गोंदवणाऱ्या व्यक्तीचं नाव राजेश कुमार जैनवाल आहे. ते मूळचे दिल्ली येथील रहिवासी आहे. राजेश जैनवाल हे काही वर्षांपासून ठाण्यात राहतात. दोन महिन्यापूर्वीच त्यांनी आपल्या कपाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू गोंदवला. जैनवाल म्हणाले, " जय भीम, जय संविधान! संविधानामुळे माझ्यातील भीती नष्ट झाली आहे. बाबासाहेब अमर आहेत. ते माझ्यासाठी दैवत आहेत. त्यांचा टॅटू हीच माझ्यासाठी ओळख आहे. बाबासाहेबांच्या चरणी माझे जीवन समर्पित आहे. जेव्हापासून आपल्या कपाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू गोंदवला, तेव्हापासून मला कुठलीही आणि कोणाचीही भीती वाटत नाही. मी जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत माझ्या कपाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू राहील, " असं राजेश कुमार जैनवाल 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.