ठाणे dombivli MIDC blast :डोंबिवली एमआयडीसीतील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाल्यानंतर एमआयडीसीमधील दुर्घटनांचा प्रश्न चव्हाट्यावर आला. या एमआयडीसीमध्ये जून २०११ ते जून २०१६ पर्यंत २९ मोठ्या, २६ लहान अशा एकूण ५५ दुर्घटना घडल्या आहेत.
गुरुवारी झालेल्या जखमींमध्ये शेजारच्या काही कंपन्यांतील कामगारांचाही समावेश आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, दुर्घटनाग्रस्त कंपनीलगतच्या, कॉसमॉस, डेक्सन, पीमको, चावरे इंडस्ट्री, शक्ती, महल प्रिंटिंग, राज सन्स, ओमेगा, श्रीनिवास केमिकल, डेक्कन कल या कंपन्यांमधील कामगारही जखमी झाले. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनही तेवढ्यापुरतं जागं होतं. त्यानंतर 'ये रे माझ्या मागल्या'प्रमाणे झोपी जातं असाच स्थानिक नागरिकांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळं एमआयडीसीतील कारखाने जणू मृत्युचे कारखाने बनत चालले आहेत.
पाच वर्षांमध्ये २९ मोठ्या घटना-डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये जून २०११ ते जून २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आग, गॅस गळती, तेलाची गळती अशा २९ मोठ्या, २६ लहान म्हणजे एकूण ५५ दुर्घटना घडल्या आहेत. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१९ या चार वर्षांच्या काळात आग, स्फोट आणि वायू गळतीच्या १८ दुर्घटना घडल्या आहेत. त्यात २१ जणांचे मृत्यू झाले. ६ मे २०१६ या दिवशी प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन आग लागली. त्यात १२ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांतर प्रशासनाला घटनेच्या दिवशी जाग झाली. सरकारनं तज्ज्ञ लोकांची चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे २४ जुलै २०१७ सव्वा वर्षानंतर घडून गेलेल्या दुर्घटनेचा अहवाल देण्यात आला. त्या अहवालात दुर्घटना टाळण्यासाठी कडक शिफारशी आणि सूचना केल्या गेल्या. मात्र, तो अहवालच कल्याणच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडं उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी समोर आणली होती.