महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनोरुग्णांना स्वावलंबनाचे धडे; व्यवसाय उपचार पद्धतीनं रुग्णांनी बनवल्या दिवाळी वस्तू

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांना स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत. मनोरुग्णांकडून उटणे, पणत्या, दिवे, कंदील, फुलवाती, लोकरी तोरण, पताके आदी वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

PSYCHOPATH MADE DIWALI ITEMS
मनोरुग्णांनी बनवल्या दिवाळी वस्तू (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

ठाणे :कुटुंबातील एखादी व्यक्ती मनोरुग्ण असेल तर पुढे त्याचं कसं होणार? हा प्रश्न सर्वांनाच सतावत असला तरी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात अशा रुग्णांना स्वावलंबी बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोरुग्णालयातील व्यावसायिक उपचार विभागामार्फत मनोरुग्णांचं मानसिक कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असून दिवाळीनिमित्त रुग्णांना उटणे, पणत्या, दिवे, कंदील, फुलवाती, लोकरीचे तोरण, पताके बनविण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत.

मनोरुग्णाचं कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न : मनोरुग्ण दिसल्यावर हा पुढे काही करू शकत नाही, असं अनेकांना वाटतं. एखाद्या कुटुंबात मनोरुग्ण असेल तर त्या कुटुंबाला ते अवघड बनून राहतं. मात्र, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामार्फत याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. परंतु उपचारासोबत रुग्णांचं अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्नही केला जातोय.सणासुदीच्या काळात लागणाऱ्या वस्तू तयार करून, मनोरुग्ण व्यक्तीचं कौशल्य जाणून ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जातोय. दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळं रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार पद्धतीनं मनोरुग्णांकडून विविध दिवाळीच्या वस्तू तयार करून घेतल्या जात असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. हेमांगिनी देशपांडे यांनी दिली.

मनोरुग्णांनी बनवल्या दिवाळी वस्तू (Source - ETV Bharat Reporter)

शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढीस मदत : व्यवसाय उपचार पद्धतीनं रुग्णांची शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढीस मोठी मदत मिळते. त्यामुळं वर्षभर रुग्णांना वस्तू तयार करण्यास शिकवलं जातं. जेणेकरून याचा फायदा मनोरुग्णांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतगार ठरू शकेल. दिवाळीत धारावीमधून पणत्या, दिवे आदी वस्तू आणल्या जातात आणि या वस्तूंना आकर्षक रंगाच्या छटा कसा द्यायच्या हे रुग्णाला शिकवलं जातं. आतापर्यंत सुमारे 1000 पणत्या, 200 उटणे पाकीट, फुलवाती, लोकरी तोरण, कंदील, पताका बनवण्याचं प्रशिक्षण रुग्णांना देण्यात आलंय.

रुग्णांना भविष्यात उपयोग होईल : "व्यवसाय उपचार पद्धतीनं रुग्णांची हात, डोळे आणि मेंदू यांची सुसूत्रता, आकलन क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. रुग्णांची आवड-निवड लक्ष्यात घेऊन त्यांना विविध वस्तू बनवण्यास शिकवलं जात असून, याचा भविष्यात रुग्णांना उपयोग होईल. मनोरुग्ण लवकर बरा होऊन, समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न असतात," असं प्रादेशिक मनोरुग्णलयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितलं.

रुग्ण स्वावलंबी होण्यास मदत :"रुग्णालयात मनोरुग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध उपक्रम करून घेतले जात आहेत. यामुळं रुग्णांचं मनोबल वाढून रुग्ण स्वावलंबी होण्यास मदत होत आहे. विविध वस्तू बनविणे किंवा त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना याठिकाणी वाव दिला जातो," असं रुग्णाचे नातेवाईक अजित शर्मा यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. मोठी दुर्घटना टळली; शालिमार एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले
  2. पाच कोटी जप्त प्रकरणावरुन राजकारण तापलं; पोलीस अधीक्षक म्हणाले...
  3. घड्याळ चिन्ह अजित पवारांकडेच राहणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details