छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील लक्षवेधी मतदारसंघात मध्य विधानसभा मतदारसंघ देखील समाविष्ट आहे. या मतदारसंघात सर्वांना आकर्षित करणारी निवडणूक यंदा देखील होणार आहे, ती म्हणजे दोन मित्र एकच पक्ष मात्र, ते परस्परविरोधी निवडणूक लढवणार आहेत. याआधी देखील 2014 मध्ये हे दोन मित्र वेगवेगळ्या पक्षातून परस्परविरोधी लढले होते. यात आता एका मित्रानं दुसऱ्या मित्राला मी तुला मदत केली, आता तू मला मदत कर अशी विनंती देखील केली आहे. पाहूयत आगळीवेगळी लढत.
दोन मित्रात लढत : औरंगाबाद मध्य मतदारसंघ यंदा चांगलाच चर्चेत आलाय. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. शिंदे गट शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्याच पक्षातील ठाकरे गटाकडून त्यांचे परममित्र किशनचंद तनवाणी हे निवडणूक रिंगणात उतरायला सज्ज झाले आहेत. तरुण वयात असल्यापासून दोघेही घट्टमित्र, प्रत्येक समारंभात कार्यक्रमात दोघे सोबत दिसत होते. त्यांच्या मैत्रीची चर्चा राजकारणात नेहमीच असायची, मात्र निवडणुकीत एकाच पक्षातून फुटलेल्या दोन गटांनी या दोघांना उमेदवारी दिली. त्यामुळं एक मित्र दुसरा मित्राच्या विरोधात निवडणूक लढण्यास सज्ज झाला आहे. 2014 मध्ये या दोघांनी पहिल्यांदा परस्परविरोधी निवडणूक लढवली होती, त्यात दोघांच्या भांडणात एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये प्रदीप जैस्वाल यांना युतीकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळी तनवाणी यांनी मात्र माघार घेतली होती.
आता त्यांनी माघार घ्यावी : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीतर्फे मध्य मतदारसंघात प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपा आणि शिवसेना एकत्र लढत असल्यामुळं मतदानांचा विभाजन टळलं आणि इम्तियाज जलील यांचा पराभव करत, प्रदीप जैस्वाल यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी किशनचंद तनवाणी पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, त्यावेळी त्यांनी माघार घेत जैस्वाल यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांनी आता मला साथ देऊन माघार घ्यावी असं आवाहनच किशनचंद तनवाणी यांनी केलंय.
विकास कामांवर निवडून येणार : आपल्या मित्रासोबत पुन्हा एकदा सामना होणार असं प्रदीप जैस्वाल यांना विचारण्यात आल्यानंतर, मित्र जरी असले तरी राजकारणात पक्षाने आदेश दिल्यावर त्यानुसारच काम करायचं असतं. 2014 मध्ये आम्ही सोबत लढलो होतो, त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. मात्र 2019 नंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आणि त्याच केलेल्या कामांच्या आधारे ही निवडणूक लढवत आहे. काम केली त्यामुळं मी निश्चित निवडून येणार समोर कोण आहे, याच्याशी काहीही फरक पडणार नाही असं उत्तर प्रदीप जैस्वाल यांनी दिलंय. किशनचंद तनवाणी यांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी, तेच निवडणूक लढवणार अशी माहिती त्यांनी दिलीय. त्यामुळं या दोन मित्रात आता बाजी कोण मारणार याकडं मतदारसंघाचं लक्ष लागलंय.
हेही वाचा -