महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, भेटीचं कारण काय? - DCM EKNATH SHINDE MEET MODI

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी करत गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळाच चर्चा रंगलीय.

Narendra Modi
शिंदे कुटुंबीयांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2024, 7:32 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडलंय. त्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटपसुद्धा झालंय. यानंतर आता राजकीय पक्षांनी आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे वळवल्याचं दिसतंय. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात. आगामी काळात राज्यातील अनेक जिल्ह्यातील महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहेत. तर मुंबई पालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्यासाठी भाजपा आणि शिंदेंची शिवसेनेनं कंबर कसली आहे. एकीकडे गृहमंत्रिपदावरून शिवसेनेनं ताठर भूमिका घेतली होती. मात्र त्यांना गृहमंत्रिपद न मिळाल्यामुळं शिंदेंची सेना नाराज असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी करत आज (गुरुवारी) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीय. या भेटीवरून राजकीय वर्तुळाच चर्चा रंगलीय.

सदिच्छा भेट :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये स्वतः एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी फोटोमध्ये दिसत आहेत. "देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आणि विश्वनेते नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झालंय. या पार्श्वभूमीवर 'विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत मोदीजी यांच्याशी चर्चा करता आली", अशी पोस्ट एकनाथ शिेंदेंनी केलीय. तर अमित शाहांची भेट घेतल्यानंतर "देशाचे कणखर नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महायुती सरकारच्या वाटचालीबाबत अमितभाई यांच्याशी चर्चा झाली. या भेटीच्या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होत्या. याप्रसंगी अमितभाईंना पारंपरिक शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली," अशी पोस्ट एकनाथ शिंदेंनी केलीय. तसेच जी विकासाची कामं राहिलीत. ती पुन्हा करायची आहेत. टीम जुनीच आहे, मॅच मात्र नवीन आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार वेगान विकासकामं करेल, त्यामुळं सरकार स्थापनेनंतर ही सदिच्छा भेट घेतल्याचं शिंदेंनी सांगितलंय. भेटीनंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

बंगल्यावरून सेनेचे मंत्री नाराज : एकीकडे मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नसल्यामुळं महायुतीचा शपथविधी लांबणीवर गेलाय. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी हे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडले. तसेच हिवाळी अधिवेशन मंत्र्यांच्या खातेवाटपाविना पार पडले. यानंतर खातेवाटप आणि मंत्रिपदावरून शिवसेनेचे मंत्री नाराज असताना आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बंगले दिले गेलेत. आणि आम्हाला फ्लॅट दिलेत, यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळं महायुतीत शिवसेना नाराज असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीवारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोणत्या कारणास्तव भेट घेतली असेल? यावरून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जाताहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details