महाराष्ट्र

maharashtra

अजित पवारांची राजकीय कुस्ती आणि फसलेले डाव - Ajit Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 4:37 PM IST

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, अजित पवार यांनी गेल्या काही काळात घेतलेले निर्णय फसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता यातून सावरण्यासाठी त्यांनी आखलेले नवे डाव पुन्हा त्यांच्या अंगलट येण्याची चित्र दिसत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामती मतदार संघातून लढणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राजकीय विश्लेषकांनी अजित पवारांची राजकीय कोंडी झाल्याचं म्हटलं आहे.

Ajit Pawar
अजित पवार (Etv Bharat Reporter)

मुंबई Ajit Pawar :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत महायुतीसोबत घरोबा केला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्याप्रमाणं आपलासुद्धा दबदबा निर्माण होईल, असं अजित पवार यांना वाटलं होतं. मात्र, परिस्थिती नेमकी वेगळी होत गेली.

लोकसभा निवडणुकीत अपयश : महायुतीमधील घटक पक्षांमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळतील, असं अजित पवार यांना वाटत होतं. मात्र, त्यांच्या अपेक्षांचा लोकसभा निवडणुकीत भंग झाल्याचं दिसून येतय. त्यांच्या पत्नीचा लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभव झाला. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं युती केल्यामुळं त्यांच्या विचारधारेचाही प्रश्न निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारामुळं त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचं तोंड पाहावं लागलय. त्यातच "सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं केल्यानं महाराष्ट्रात अजित पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूतीसुद्धा कमी झाली. त्याचा फटका त्यांना राज्यात भोगावा लागल्याचं" ज्येष्ठ राजकीय पत्रकार संजय जोग यांनी सांगितलं.

एजन्सीच्या सल्ल्यानुसार कपड्यात बदल :अजित पवारांना शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखलं जातं. सकाळी साडेसहा वाजता लोकांना भेटून ते कामाला सुरवात करतात. त्यामुळं लोकांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही त्यांचा मोठा वचक असल्याचं दिसून येतं. त्यांची ही प्रतिमा गेली अनेक वर्ष महाराष्ट्रानं पाहिली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या अपयशानंतर अजित पवारांनी एका पीआर एजन्सीला काम दिलं. त्या एजन्सीला कोट्यवधी रुपये देऊन अजित पवारांनी त्याचे सल्ले घेतले. त्यानुसारच त्यांनी आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या वक्तव्यांमध्ये बदल केला आहे. मात्र, त्यांच्या मूळ स्वभावाच्या विपरीत हा सल्ला असल्यानं त्याचा फायदा होण्याऐवजी अजित पवारांना तोटाच होताना दिसतोय. जनतेमध्ये पुन्हा एकदा सहानुभूती मिळावी, म्हणून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं चूक होती, असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळं आता बारामतीमध्ये 'ते' युगेंद्र पवार यांच्या विरोधात लढणार अशा चर्चा सुरू आहेत. तसंच ते कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांविरोधा लढणार अशा बातम्या येत आहेत. मात्र, त्यात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी दिली आहे.

अजित पवारांच्या बंडाचे परिणाम :अजित पवार यांनी भाजपासोबत युती करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोनवेळा बंड केलं होतं. त्यांनी एकदा सर्व आमदारांच्या सह्या घेऊन उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांनी सर्वांना धक्का दिला होता. मात्र, पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्यानं या बंडाचा फारसा परिणाम झाला नाही. तसंच जनतेनंही त्यांच्या त्या बंडाला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र, नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत घेतलेली भूमिका जनतेला रुचलेली दिसत नाही. म्हणूनच अजित पवार यांना जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून लोकांसमोर जावं लागतंय, असं तानपाठक म्हणाले.

अजित पवारांची घरातच कुस्ती :जय पवार बारामतीमधून निवडणूक लढवू शकतात, असं अजित पवारांनी विधान केलय. "बारामतीमधून आपण अनेक वर्ष निवडून येतोय. त्यामुळं आपल्याला आता तिथं रस नाही, असंही ते म्हणाले. त्यावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. "अजित पवार केवळ घरातच कुस्ती करणारे पैलवान आहेत. त्यांना केवळ कुटुंबातील सदस्याविरोधात लढण्यात रस आहे. अजित पवार आता बारामतीमधून लढणार नाहीत. कारण बारामतीच्या लोकांनी अजित पवारांचा लोकसभा निवडणुकीत रस काढलाय", असं राऊत म्हणाले.

अजित पवारांसमोरील आव्हानं :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सध्या अनेक आव्हानं आहेत. त्यांना आपली प्रतिमा पुन्हा एकदा सकारात्मक करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी त्यांनी सरकारच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी विविध योजनाचा पाऊस पाडलाय. भाजपासोबत गेल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा आपला परंपरागत मतदार आपल्याकडं वळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक आता अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कारण त्यांना ही निवडणूक होईपर्यंत आमदारांना आपल्यासोबत ठेवण्याचं आव्हानही पेलावं लागणार आहे. तिसरं अत्यंत महत्त्वाचं आव्हान म्हणजे युतीमध्ये एकत्र असल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त जागा पदरात घेण्याचं आव्हान आहे. तसंच युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याचं शिवधनुष्य त्यांना पेलावं लागणार आहे. अतिशय दृढनिश्चयी असणारे अजित पवार सध्या डगमगलेल्या अवस्थेत दिसत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडीला यश मिळाल्यास अजित पवार यांच्यासाठी ही शेवटची राजकीय लढाई ठरेल. त्यामुळं अजित पवार यांना खूप कसरत करावी लागणार आहे. मात्र, पवार घराण्यातील व्यक्तीच कशा निवडून येतील तसंच घरातच कशी सत्ता राहील, यासाठी दोन्ही पवारांचा अंतर्गत प्रयत्न आहे. बाकी ही वरवरची दाखवण्याची लढाई असल्याचा दावा तानपाठक यांनी केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details