ठाणे Thane Illegal Constructions: येऊर-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमा सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलांनी आंकुचन पावत असताना, आता जंगलातही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. मात्र, आता वनविभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. चेना परिमंडलातील पानखंडा राखीव वनामध्ये अनधिकृतरित्या निवासी (Illegal Constructions) अणि व्यवसायिक कामासाठी तब्बल १२ एकरच्या जागेत केलेले अतिक्रमण वनविभागाने कारवाई करून जमीनदोस्त केलं आहे.
भूखंड केला मोकळा: मुंबई-ठाणे शहराचं नैसर्गिक फुफ्फुस म्हणून येऊर-संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ओळखला जातो. मात्र, वाढत्या अतिक्रमणानं जंगलातील जैव विविधता धोक्यात आलीय. जंगलावर अनधिकृत कब्जा करून अनेक धनदांडग्यांनी निवासी हॉटेल, रिसॉर्ट उभारले आहेत. परंतु वनविभागानं अशा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उचलला आहे. "शनिवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पानखंडा (ओवळा) येथील सर्व्हे क्रमांक २९१ मधील राखीव वनक्षेत्रात केलेले अतिक्रमण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वन संरक्षक श्री. जी. मल्लिकार्जुन, उपसंचालक उदय ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून भूखंड मोकळा केला," अशी माहिती, येऊर वन परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली.