जळगाव : पाळधी या गावात नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट लागलं आहे. किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. पाळधीमध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर समाज कंटकानी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास गॅरेज समोर उभी तीन ते चार चारचाकी वाहनं पेटवून दिली. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचं निमित्त झालं आणि दोन गट समोरासमोर आले. या वाहनात मंत्री गुलाबराव पाटील नव्हते.
मंत्र्यांच्या गाडीचा धक्का लागल्यानं समाजकंटकांचा राडा : पाळधी इथं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागून मोठा राडा झाला. गुलाबराव पाटील यांच्या वाहनातून त्यांच्या पत्नी जात होत्या. मात्र त्याच वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाळधी गावात दोन गटात वाद झाला. हा वाद नंतर इतका पेटला की रात्री एक वाजताच्या सुमारास वाहनं पेटवून देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गॅरेजमधील कामगार घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून वाहने विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. वाहनं पेटवून दिल्याची घटनेची माहिती पोलीस कर्मचार्यांना सुद्धा उशिरानं मिळाली. या घटनेमध्ये समाजकंटकांनी दोन ते तीन दुकानं पेटवून दिली, तर काही दुकानांची तोडफोड करत नुकसान करण्यात आलं. अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत पेटवण्यात आलेली सर्व वाहनं आणि दुकान जळून खाक झाली. पेटलेल्या दुकानांची आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न कामगार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून पहाटेपर्यंत सुरू होते.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात : जळगावच्या पाळधीमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वाहनातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचार बंदीबाबत सूचना देण्यात आली. पाळधी गावांमध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सात ते आठ संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा या ठिकाणी रात्रभरापासून ठाण मांडून होता. सद्यस्थितीत पाळधी गावामध्ये पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. किरकोळ भांडण झाल्यानं त्यावरून दोन गटात वाद झाला. घटनेनंतर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 20 ते 25 अज्ञात व्यक्तींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा :