मुंबई-क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जातेय.
क्रिकेटमधील रुचीने संझगिरींमधला क्रिकेट समीक्षक घडला :दरम्यान, द्वारकानाथ संझगिरी यांनी खुमासदार क्रिकेट लेखन केलंय. त्यांची अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत. तसेच क्रिकेटवर त्यांनी अनेक कार्यक्रम केलेत. मराठी साहित्य आणि क्रिकेटमधील रुचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. द्वारकानाथ संझगिरी हे पेशानं सिव्हिल इंजिनीअर होते. मुंबई महापालिकेत द्वारकानाथ संझगिरी हे उच्च पदावर कार्यरत होते. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अनेक दिग्गज मंडळीसोबत त्यांनी क्रिकेटमधील आठवणी, किस्से आणि प्रसंग यावर कार्यक्रम केलेत. त्यांच्या क्रिकेटवरील लेखणाला मराठी माणसांनी नेहमीच पसंती दिलीय. द्वारकानाथ संझगिरी यांच्या जाण्यामुळे शोक व्यक केला जातोय.
क्रिकेट प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरींनी साधली- फडणवीस :महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आणि मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे द्वारकानाथ संझगिरी आज निमाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेटशिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. क्रिकेट या खेळावर त्यांनी अखेरपर्यंत निस्सीम प्रेम केले. त्यांच्या निधनाने एक उत्कट क्रीडाप्रेमी, क्रिकेट विषयीच्या लेखन-समीक्षणाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलंय. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे चाहते, कुटुंबीयांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय.
क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला- अजित पवार :कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.